कऱ्हाड : मंगेश कडव या युवकास पैशांची मागणी करत मारहाण करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शनिवारी तिघांना ताब्यात घेतले. विक्रम जयवंत येडगे (वय २२, रा. जखिणवाडी, ता. कऱ्हाड), संतोष प्रल्हाद मदने (२२, रा. वनवासमाची, ता. कऱ्हाड) याच्यासह अन्य एकास पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आगाशिवनगर परिसरातील मंगेश कडव याला अटकेत असलेल्या ओंकार खबाले पाटील याने २ सप्टेंबर रोजी ओंकारसह एक महिला, चार मित्रांनी मारहाण केली होती. या घटनेनंतर मंगेशचा मृतदेह कुरळप पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारणा नदीत सापडला होता. याप्रकरणी मारहाण करणाऱ्यांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल होता. पोलिसांनी मुख्य संशयित ओंकार खबाले यास अटक करत चौकशी केली. सहायक रेखा निरीक्षक दुधभाते यांच्या पथकाने अन्य संशयित विक्रम येडगे, संतोष मदने व अन्य एकास ताब्यात घेतले. या प्रकरणातील आणखी एक महिला संशयित पसार आहे. दरम्यान, या घटनेमागे नेमके कारण काय आहे? या प्रकरणात आणखी काही युवकांचा सहभाग आहे का? याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.