फलटण (जि. सातारा) : फलटण तालुक्यातील धुमाळवाडी धबधबा परिसरात पर्यटनासाठी आलेल्यांना अडवून शस्त्राचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या टोळीतील तीन आरोपींना ग्रामीण पोलिसांनी अटक केली. आणखी सातजण फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.फलटण तालुक्यातील धुमाळवाडी धबधबा परिसरात मंगळवार, दि. ८ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास धुमाळवाडी येथील धबधबा पाहून काही पर्यटक जाण्यासाठी निघाले होते. वारुगडच्या टेकडीवरून टेहाळणी करणाऱ्या १० आरोपींनी महिला पर्यटकांना हेरून धबधब्यापासून अवघ्या दोनशे मीटर अंतरावर गाठून त्यांना लाकडी दांडकी व लोखंडी सुऱ्याचा धाक दाखवून लूटमार केल्याची घटना घडली होती.यामध्ये पर्यटक महिलांच्या गळ्यातील सोन्या-चांदीचे दागिने व पर्यटक पुरुषाकडील मनगटी घड्याळ व पैसे असा ५४ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरून नेल्याची घटना होती. दीपक नामदेव मसुगडे (वय ३०, रा. नवलेवाडी, मलवडी, ता. माण), विलास ऊर्फ बाबू दत्तात्रय गुजले (२१, रा. खांडज, ता. बारामती, जि. पुणे), चेतन शंकर लांडगे (२५, रा. सोनगाव बंगला, ता. फलटण) यांना अटक केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली देऊन गुन्हा करताना वापरलेला चाकू व मोटारसायकल असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
Satara: शस्त्राचा धाक दाखवून पर्यटकांना लुटणाऱ्या तिघांना अटक, आणखी सातजण फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 13:44 IST