सातारा : कधी काळी पेन्शनरांचं गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साताऱ्यानं जशी अलीकडे कात टाकलीय, तशीच जिल्ह्यातील शेकडो गावांनीही नुकताच आपला कारभार सळसळत्या तरुण रक्ताच्या हाती दिल्याचे ‘लोकमत’ सर्वेक्षणात स्पष्ट झालेय. सातारा जिल्ह्यात नुकत्याच ७०८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. तालुक्यातील अनेक मातब्बर गटांच्या संघर्षातून गावोगावी मोठ्या चुरशीने ग्रामपंचायत सदस्य निवडले गेले. यानंतर गेल्या आठवड्यात सरपंच, उपसरपंचांच्याही निवडी झाल्या. यातील बहुतांश सरपंच अत्यंत तरुण वयात निवडले गेले असून, ‘यंग लिडर’ म्हणून या गावांनी आता स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलीय. ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात ४० टक्क्यांपेक्षाही जास्त गावांमध्ये सरपंच किंवा उपसरपंच तिशीच्या आतील आहेत. ३५ टक्के गावकारभारी तीस ते चाळीस वयोगटांतील आहेत. १५ टक्के सरपंच चाळीस ते पन्नाशीतील आहेत. बाकीचे दहा टक्के पन्नाशीच्या वरचे आहेत. महिलांसह विविध जातींच्या आरक्षणामुळे कमी वयाचे पदाधिकारी जास्तीत जास्त गावांमध्ये दिसून येऊ लागले आहेत. विशेष म्हणजे, अत्यंत तरुणपणी सरपंच किंवा उपसरपंच पदावर आरुढ झालेल्या या मंडळींच्या जुन्या पिढींचा आजपावेतो कधीच राजकारणाशी संबंध न आल्याचेही या सर्वेक्षणात उघड झाले आहे. केवळ राजकारणात करिअरच्या हेतूने निवडणुकीला उभारल्याचेही अनेकांनी स्पष्टपणे सांगितले. (प्रतिनिधी) १५ पेक्षाही जास्त सरपंच केवळ एकवीस वर्षांचे असून, यातील बहुतांश अद्याप महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. पंचविशीच्या पुढील अनेक मंडळी चांगल्या कंपनीत नोकरीला असून, केवळ समाजकारणाच्या माध्यमातून गावाचा विकास करण्याच्या ध्येयाने झपाटलेली आहेत. ‘गावकी’ अन् ‘भावकी’च्या बाहेर जाऊन राजकारणविरहित गावगाडा हाकण्याचाच मानस बहुतांश तरुण गावकारभाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केलाय.
गावकारभार विसावला तरुणाईच्या हातात !
By admin | Updated: August 30, 2015 00:12 IST