पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे येथील प्रॉफीट मार्टमध्ये हृदया गुप्ता हा शेअर मार्केटमध्ये नोकरीस होता. शेअर मार्केटमधून कमी दिवसात जास्त टक्क्यांनी पैसे परत देण्याचे आमिष दाखवत हृदया गुप्ता याने कऱ्हाड येथील अमित आंबेकर व त्याचे मित्र सचिन वाघमारे यांच्याकडून १९ लाख ८७ हजार ५०० रुपये वेगवेगळ्या बँक खात्यावर मागवून घेऊन पळून गेला होता. त्यास कऱ्हाड पोलिसांनी २७ जानेवारी रोजी ग्रेटर नोएडा उत्तर प्रदेश येथून अटक केली. त्यास न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलीस कोठडीत अधिक तपास केला असता गुप्ता याने सातारा, अहमदनगर, बीड व पुणे जिल्ह्यांतील लोकांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये बीड येथील एसटी चालक यांनी कर्ज काढून पैसे गुंतवले होते, तर पुणे येथील एकाने वडिलांचे निवृत्तीनंतरचे फंडाचे पैसे गुंतवले होते. गुप्ता याने ८१ लोकांची सुमारे १३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
हृदया गुप्ता याने शेअर मार्केटमध्ये नोकरी करत असताना त्याची कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या वेगवेगळ्या लोकांशी ओळख झाली. ओळखीचा फायदा घेऊन गुप्ता याने कंपनीपेक्षा जास्त फायदा व हमखास प्रति महिना उत्पन्न असे आमिष लोकांना दाखविले. त्याबाबत कागदोपत्री करार करून हमी दिली. सुरुवातीला विश्वास संपादन करणसाठी ५ ते ६ महिने प्रति महिना परतावा दिला. लोकांचा विश्वास संपादन झाल्याचे समजताच गुप्ता याने मोठ्या रकमेची मागणी करून ती प्राप्त करून सर्व रक्कम घेऊन पोबारा केला.
- चौकट
महागड्या कार, ब्रॅंडेड घड्याळसह परदेश दौरे
हृदया गुप्ता याने या पैशातून महागड्या गाड्या खरेदी केल्या आहेत. त्याबरोबरच फाईव्हस्टार हॉटेलमधील राहणे, परदेश दौरे, विमान प्रवास, महागडे कपडे, घड्याळे अशा प्रकारे लोकांचा मिळवलेला पैसे त्याने खर्च केला असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. रणजित पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमित बाबर तपास करीत आहेत.