भोलेनाथ केवटे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जिल्ह्यातील दुष्काळाची तीव्रता वाढत असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना वणवण करावी लागत आहे. पाण्यासाठी ग्रामस्थांचे होणारे हाल थांबवण्यासाठी खोकडवाडी येथील एका शेतकऱ्याने सामाजिक बांधिलकीने स्वखर्चातून आपल्या शेतात बोअरवेल खोदली. गेल्या सात वर्षांपासून ते या बोअरवेलमधून संपूर्ण गावाला पाणी पुरवठा करून ग्रामस्थांची तहान भागवत आहेत.सातारा तालुक्यातील खोकडवाडी हे ६० ते ६५ घरांचं छोटंसं गाव. दुष्काळामुळे गावात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण जाला आहे. हंडाभर पाण्यासाठी काही किलोमीटरचे अंतर कापावे लागत असते. गावातीलच एका विहिरीवरून पाणी आणावे लागते; पण ते पाणी पिण्यायोग्य नाही. हंडाभर पाण्यासाठी उन्हातन्हाचे महिला व लहान मुलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. ग्रामस्थांचे होणारे हाल थांबण्यासाठी गावातील संतोष सावंत यांनी गावात निर्माण झालेली पाणीटंचाई लक्षात घेऊन सात वर्षांपूर्वी शेतात एक बोअर खोदली. तिथून प्रत्येक घरापर्यंत त्यांनी स्वखर्चातून अडीच ते तीन किलोमीटर पाईपलाईन करून त्याद्वारे गावातील प्रत्येक घरात पाणीपुरवठा करत आहेत. सकाळी सहा ते अकरा या वेळेत टप्प्याटप्प्याने गावातील प्रत्येक भागात पाणी पुरवठा केला जातोय. त्यामुळे गावातील नागरिकांना त्यांच्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांनी मागच्या वर्षी अजून एक बोअर घेतली आहे; मात्र पहिल्याच बोअरला भरपूर पाणी असल्याने दुसरी बोअर त्यांनी बंदच ठेवली आहे.दुरुस्तीसाठी गावातील काहीजणांकडून पैसेगावाला पाणी देत असताना त्यासाठी येणारा इतर दुरुस्तीचा खर्च ते गावातील ज्यांना पैसे देणे शक्य आहे, त्यांच्याकडूनच ते पैसे घेतात आणि नागरिकही पैसे देतात.गावाला मोठा दिलासासंतोष सावंत यांनी स्वखर्चातून बोअरवेल घेऊन तसेच स्वखर्चातूनच गावातील प्रत्येक घरापर्यंत पाईपलाईनने पाणीपुरवठा करत गावाला मोठा दिलासा दिला आहे.
स्वत:च्या बोअरवेलमधून भागविली गावाची तहान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 23:04 IST