सातारा : येथील शाहूनगर गाेडोली परिसरातील शिवम बंगला फोडून अज्ञात चोरट्यांनी बंगल्यातील ६० हजार रुपयांची रोकड आणि साहित्य चोरून नेले. ही घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली.
याबाबत सचिन यशवंत शिंदे (४०, रा. शिवाजी हाैसिंग सोसायटी, सदर बझार, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिंदे यांच्या सासू दीपलक्ष्मी घाटगे (६२) यांचा शाहूनगर येथे शिवम बंगला आहे. हा बंगला दि. ११ ते १५ सप्टेंबर या कालावधीत बंद होता. याचदरम्यान चोरट्यांनी बंगल्याच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडून बंगल्यात प्रवेश केला. घरातील ६० हजार रुपयांची रोकड आणि दागिने तसेच इतर साहित्यही चोरट्यांनी लंपास केले. बुधवारी दुपारी हा प्रकार निदर्शनास आला. यानंतर शिंदे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एस.व्ही. कदम हे अधिक तपास करत आहेत.