सातारा : पोलीस भरतीपूर्व परीक्षेसाठी मार्गदर्शन करणारी अॅकॅडमी ‘त्यांनी’ सुरू केली होती. काही कारणांनी ती बंद पडली. ‘ते’ तरुण बेकार झाले. ‘ईझी मनी’साठी काहीतरी शोधू लागले. त्यातूनच सुपारी घेण्यासारखे खतरनाक उद्योग त्यांचे टोळके करू लागले. त्यातूनच त्यांनी झटपट पैशांसाठी बजरंग गायकवाड यांची सुपारी घेतली, असे तपासात पुढे येत आहे. आरळे (ता. सातारा) येथील बजरंग जगन्नाथ गायकवाड (वय ३१) यांचा अपहरण करून खून करण्यात आल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या अटकेसाठी कसून प्रयत्न सुरू केले. बजरंग गायकवाड यांचे आर्थिक व्यवहारातून ज्याच्याशी वितुष्ट आले होते, त्या राजेंद्र ऊर्फ वैभव रामराव पवार याच्यासह वासुदेव शिवाजी जांभळे, आकाश शरद सोनटक्के या तिघांना अटक झाल्यानंतर या प्रकरणातील क्रौर्य हळूहळू बाहेर येऊ लागले. राजेंद्र पवार याने इतरांना सुपारी दिल्याचे स्पष्ट झाल्यानंतर टोळक्यातील इतरांचा शोध सुरू झाला. गुरुवारी रात्री उशिरा या प्रकरणातील चौथा आरोपी संदीप रावसाहेब भोसले (वय २८, रा. अग्रम धुळगाव, ता. कवठे महांकाळ, जि. सांगली) याला अटक करण्यात आली.बजरंग गायकवाड यांचे अपहरण करून रहिमतपूरजवळील अंभेरी घाटात जंगलात नेऊन जबर मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर सातारा येथे एका खोलीत त्यांना कोंडून ठेवण्यात आले. दुसऱ्या दिवशी ते मृतावस्थेत आढळल्यावर आरोपींनी अंभेरी घाटात मृतदेहाची विल्हेवाट लावली होती. अंभेरी घाटातील परिस्थिती पाहिली असता आणखी काहीजणांचा सहभाग या प्रकरणात असला पाहिजे, अशी पोलिसांना खात्री पटली. त्या दिशेने तपास करताना अटक तिघांव्यतिरिक्त आणखी किमान तिघा-चौघांचा सहभाग हळूहळू स्पष्ट होत गेला. चौथा आरोपी संदीप भोसले याला गुरुवारी ताब्यात घेण्यात आले. आणखी दोन ते तीन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. या टोळक्यातील दोन-तीन जणांनी पूर्वी भरतीपूर्व परीक्षा मार्गदर्शन अॅकॅडमी सुरू केली होती. ती बंद पडल्यावर हे तरुण बेकार झाले आणि वाममार्गाला लागले. बजरंग गायकवाड खून प्रकरणातील सहभागाबरोबरच त्यांनी आणखी काही गुन्हे केले आहेत का, याचाही पोलीस शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)गुन्ह्यातील मोटारसायकल जप्तबजरंग गायकवाड यांचा मृतदेह जाळण्यासाठी आरोपी अंभेरी घाटात गेले तेव्हा त्यातील दोघेजण मोटारसायकलवरून गेल्याचे उघड झाले होते. ती पोलिसांनी जप्त केली आहे. दरम्यान, संदीप भोसलेला मोबाइल लोकेशनच्या साह्याने रहिमतपूर-अंभेरीदरम्यान पकडण्यात आले. शुक्रवारी त्याला न्यायालयासमोर उभे केले असता दि. १२ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
आली बेकारी... घेतली सुपारी!
By admin | Updated: April 10, 2015 23:50 IST