सातारा : जिल्ह्यात तीन वर्षांनी लम्पी चर्मरोगाचे संकट पुन्हा वाढले असून, दीड महिन्यांत ६२९ जनावरांना बाधा झाली आहे. त्यापैकी सध्या २४६ जनावरांवर उपचार सुरू आहेत, तर ३० पशुधनाचा रोगामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे पशुसंवर्धन विभागाने हालचाली वाढवल्या असून, काही प्रमाणात निर्बंधही घालण्यात येणार आहेत. तसेच पशुसंवर्धनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही जिल्ह्याच्या सीमेवर लम्पी बाधित जनावर येऊ नयेत यासाठी तपासणीबाबत सूचना दिल्या आहेत.
राज्यात मागील तीन वर्षांपूर्वी लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव सुरू झाला. सातारा जिल्ह्यातही या रोगाचा मोठा परिणाम झाला होता. एका वर्षात हजारो जनावरांना लम्पीने बाधित केले होते, तर दीड हजाराहून अधिक पशुधनाचा रोगामुळे मृत्यू झाला होता. त्याच काळात गोवंशीय जनावरांचे लसीकरण करण्यात आले. त्यामुळे त्यानंतर लम्पी बाधित पशुधनाचा आकडा कमी होत गेला.तरीही मागील दोन वर्षांत हा आकडा कमी असला तरी माहितीवर उपचार सुरू होते. मात्र, मागील दीड महिन्यापासून लम्पी चर्मरोग पुन्हा वाढत आहे. बाधित जनावरांची संख्या दररोज वाढत असून, आतापर्यंत ३० जनावरांचा मृत्यू झाला आहे. सध्या २४६ जनावरांवर उपचार सुरू असून, ३५३ जनावरे रोगातून बरी झाली आहेत. जिल्ह्यातील लम्पी रोगाचा प्रसार पाहता प्रशासनाने आटोकाट उपाययोजना केल्या आहेत. जनावरांचे लसीकरण सुरू आहे.जिल्ह्यात लम्पी रोगाच्या पार्श्वभूमीवर गावागावांत जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच शेतकरी मेळाव्यांतून रोगासंदर्भात माहिती दिली जाणार आहे. यासाठी पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी सूचनाही दिल्या आहेत. बाधित क्षेत्रात जनावरांना उपचार करणे, गोवंशीय पशुधनाचे लसीकरण करणे, तसेच सोशल मीडिया, फ्लेक्स, पत्रके आणि गावांतून दवंडी करून लम्पी रोगाबाबत जनजागृती करावी, असेदेखील आयुक्तांनी सांगितले आहे.
शासकीय रुग्णालयात मोफत उपचार उपलब्धजिल्ह्यात काही तालुक्यांत लम्पी रोगाचे प्रादुर्भाव अधिक आहे, त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने मोहीम तीव्र केली आहे. लम्पी झाल्यानंतर शेतकरी अनेकदा खासगी डॉक्टरांकडे उपचारासाठी जातात, ज्यामुळे त्यांना आर्थिक भार सहन करावा लागतो. या परिस्थितीत पशुसंवर्धन विभागाने शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात लम्पी बाधित जनावरांना मोफत उपचार करून घेण्याचा आग्रह धरला आहे.
आतापर्यंत आकडेवारी :
- बाधित जनावरे : ६२९
- रोगमुक्त पशुधन : ३५३
- जनावरांचा मृत्यू : ३०
- उपचार सुरू : २४६
सावधगिरी बाळगा :
- बाधित जनावरांना सामान्य पशुधनापासून वेगळे ठेवा.
- गोठा वारंवार निर्जंतूक करा.
- सायंकाळी कडुलिंबाचा पाला जाळून धूर करा.
- माशी, डास यांचे प्रमाण कमी करण्याची काळजी घ्या.
- पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण करा.
जिल्ह्यात लम्पी बाधित जनावरे आढळून येत आहेत. यासंदर्भात पशुसंवर्धन विभागाचे आयुक्तांनी उपाययोजना केल्या आहेत. सध्या पावसाळा असल्यामुळे पाऊस पडल्यावर गोचीड, गोमाशी आणि माशांची संख्या वाढते, ज्यामुळे रोगाच्या प्रसाराची शक्यता जास्त आहे. शेतकऱ्यांनी सायंकाळच्या ५ ते ६ वाजता गोठ्यात औषध फवारणी करावी आणि लिंबाच्या पानाचा धूर करावा. तसेच जनावरे आजारी पडल्यास शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात मोफत तपासणी आणि उपचार करावेत. - डॉ. दिनकर बोर्डे, उपायुक्त पशुसंवर्धन विभाग