सचिन काकडे
सातारा : साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाचा अनमोल ठेवा असलेले आणि अनेक वर्षांपासून कचऱ्याने ग्रासलेले ‘मोती तळे’ आता लवकरच कात टाकणार आहे. या तळ्याच्या संवर्धनाचा रखडलेला प्रश्न मार्गी लागला असून, शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून तब्बल ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून तळ्याचे सौंदर्य पुन्हा एकदा उजळून निघणार आहे.छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्यानंतर गादीवर आलेल्या अप्पासाहेब महाराजांनी जुन्या पालिकेपाशी हे तळे बांधले होते. या तळ्यातील पाण्याने रेशीम धुतल्यास त्याला मोत्यासारखी चकाकी येत असे, म्हणूनच याला ‘मोती तळे’ असे नाव पडले असावे, असे सांगितले जाते. या तळ्यात पूर्वी गणेशमूर्ती विसर्जन केले जात असे, मात्र प्रदूषणामुळे न्यायालयाने त्यावर बंदी घातली. गेल्या सात-आठ वर्षांपासून हे तळे तारेच्या कुंपणात बंदिस्त असून, देखभालीअभावी त्याची मोठी दुरवस्था झाली आहे.
पाठपुराव्याला आले यश..माजी उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांनी या तळ्याच्या संवर्धनासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. खासदार उदयनराजे भोसले यांनी हा विषय गांभीर्याने घेतल्याने या कामाला शासनाकडून ५० लाखांचा निधी उपलब्ध झाला. नुकतीच किशोर शिंदे, दिलीप चित्रे आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तळ्याची प्रत्यक्ष पाहणी करून नियोजित कामाचा आढावा घेतला.
असे असेल कामाचे स्वरूपविकासाच्या पहिल्या टप्प्यात तळ्यातील सर्व पाणी बाहेर काढून ते गाळमुक्त केले जाणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सुशोभीकरणाचे काम सुरू होईल. यामध्ये इतिहासाचे दर्शन घडेल अशा पद्धतीने बांधकाम केले जाणार असून, नागरिकांसाठी बैठक व्यवस्था, कारंजी, पदपथ आणि आधुनिक प्रकाशयोजना केली जाणार आहे. या कामामुळे मोती तळ्याला पुन्हा एकदा वैभव प्राप्त होणार आहे.
Web Summary : Satara's Moti Lake, neglected for years, is set for restoration with ₹50 lakh funding. The lake will be desilted, beautified with historical elements, seating, fountains, walkways, and modern lighting. This revives a heritage site, once known for its water's silk-shining properties.
Web Summary : सतारा की मोती झील, वर्षों से उपेक्षित, ₹50 लाख के धन से पुनरुद्धार के लिए तैयार है। झील को गाद से निकाला जाएगा, ऐतिहासिक तत्वों, बैठने की जगह, फव्वारे, रास्ते और आधुनिक प्रकाश व्यवस्था के साथ सुंदर बनाया जाएगा। इससे रेशम चमकाने वाले पानी के लिए जाने जाने वाले विरासत स्थल का पुनरुद्धार होता है।