म्हसवड : सातारा-पंढरपूर रोडवर पिलीव घाटादरम्यान एसटी व ट्रॅक्टर यांच्यात धडक होऊन पाचजण गंभीर तर इतर दहाजण किरकोळ जखमी झाले. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा हौदा या धडकेत अपघात स्थळापासून २५ फूट उडून गेला होता. ट्रॉलीची फक्त चेसी (सांगाडा) अपघातस्थळावर होती. अपघातानंतर ड्रायव्हर फरार झाला असून जखमीवर म्हसवड येथे उपचार सुरू आहेत.पोलीस ठाण्यातून मिळाल्या माहितीनुसार सोमवारी रात्री ११.३० च्या सुमारास सातारा-अक्कलकोट ही सातारा डेपोची एसटी सातारा-पंढरपूर रोडवरून धूळदेवकडे निघाली होती. पिलीव घाट सुरू होताच त्याठिकाणी पंढरपूरच्या बाजूने भरधाव वेगाने ट्रॅक्टर आला. अपघात होतो आहे, हे लक्षात येताच चालकाने ट्रॅक्टरचे तोंड बाजूला केले त्यामुळे समोरून आलेल्या एसटीची धडक ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला बसली. धडक एवढी जोरदार होती की, ट्रॉलीचा लोखंडी हौदा अपघातस्थळापासून सुमारे २५ फूटावर उडून पडला. या अपघातात एसटीमधील रशीन सुलेमान शेख, नूरजाँ, रशिद शेख व त्याचा दोन वर्षांचा मुलगा अलिशा शेख, मिथू मुजावर व एसटी ड्रायव्हर भरत आकाराम माथणे गंभीर जखमी झाले. एसटी ड्रायव्हर या धडकेमध्ये दीड तास अडकून बसला होता. एसटीच्या चालकाच्या बाजूकडील भाग पूर्णपेण फाटून चिंधड्या झाल्याने चालकाचा पाय अडकला होता. चालकाच्या मागील सिटवर बसलेले शेख व मुजावर गंभीर जखमी झाले. ट्रॅक्टर चालक फरार असून तपास सुरू आहे. दरम्यान सातारा एसटी विभाग नियंत्रक थोरात व दहिवडी डेपो मॅनेजर नेर्लेकर यांनी अपघातामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांची चौकशी केली. (वार्ताहर)परिवहणचा मदतीचा हातजखमीच्या उपचारांचा खर्च एसटी महामंडळ करणार असून तातडीची मदत म्हणून जखमींना प्रत्येकी एक हजार रुपये देण्यात आले आहे. अपघातातील गंभीर जखमींवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केल्यानंतर म्हसवड येथील खासगी रुग्णालयात उपचासाठी दाखल करण्यात आले. तर दहाजणांना उपचार करून सोडण्यात आले. ट्रॅक्टर चालकाला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होत आहे. .
एसटी-ट्रॅक्टर धडकेत दहा जखमी
By admin | Updated: December 9, 2014 23:16 IST