फलटण : फलटण व परिसरात उन्हाची ताप चांगलीच वाढली असून, फलटणच्या तरडगाव, सुरवडी, नांदल परिसरात ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. गेली दोन दिवस उष्णता वाढली असून, दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत पारा ४० अंशांच्यावर गेला होता. दुपारी दोन वाजता उष्णता आणखी वाढली आणि पारा ४१ अंशांवर जाऊन पोहचला. सायंकाळी ५ वाजले तरी वातावरणात उष्णता प्रचंड प्रमाणात होती.एरव्ही दुपारी रस्त्यावर दिसणारी वाहनांची वर्दळ कमी झाली होती. त्याचप्रमाणे शेतातील कामे पूर्णपणे बंद होती. अनेक शेतकरी रात्रीच कामे करण्याला पसंती देत आहेत. छोट्या व्यावसायिकांना याचा चांगलाच फटका बसला असून, नागरिक घराबाहेर पडत नसल्याने छोट्या व्यावसायिकांची विक्री रोडावल्याचे दिसत होते. उन्हाच्या झळा इतक्या तीव्र होत्या की, नोकरी व कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. गेली आठवडाभर उष्णता वाढत असून, बुधवारी पारा ४१ अंशांवर गेल्याने पर्यावरण अभ्यासकांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. आणखी चार-पाच दिवस उष्णता वाढत राहणार, असे दिसते. त्यामुळे पारा आणखी किती वाढतो याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
फळांची मागणी वाढली..उष्णता वाढल्याने शरीरात गारवा निर्माण करणाऱ्या फळांची मागणी वाढली असून, कलिंगड, टरबूज, काकडी, संत्रा, मोसंबी, द्राक्ष या फळांची मागणी वाढली आहे.