अर्जुन कर्पे -- कवठेमहांकाळ जिल्ह्यासह तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात युवक राष्ट्रवादी कॉँग्रेस फक्त नावापुरतीच उरली असून, युवक राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ताजुद्दीन तांबोळी तसेच जिल्हाध्यक्ष शरद लाड जिल्ह्यातून परागंदा झाले असल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे. तसेच या दोघा पदाधिकाऱ्यांना शोधण्याची वेळ उरल्या-सुरल्या युवक राष्ट्रवादीच्या बेदखल युवक कार्यकर्त्यांवर आली आहे.राज्याचे तसेच जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाचे युवकांचे आधारस्तंभ म्हणून ओळखले जाणारे आर. आर. (आबा) पाटील यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण राज्यातच राष्ट्रवादी पक्षाची पीछेहाट होण्यास सुरुवात झाली आहे. त्याचे अधिक नुकसान तासगाव - कवठेमहांकाळ मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या सर्वच कार्यकर्त्यांचे झाले आहे. राजकारणाच्यादृष्टीने युवकांचा विचार करताना राष्ट्रवादीशी राजकीय नाळ जोडली गेलेले युवक कार्यकर्ते निराधार झाले आणि त्यांची आजअखेर वाताहत सुरूच आहे. त्यामुळे या सर्व राजकीय वाताहतीचा फटका राष्ट्रवादी पक्षाला बसला आहे. भविष्यात या युवक कार्यकर्त्यांची उणीव राष्ट्रवादी पक्षाला जाणवणार असून याची फार मोठी किंमत पक्षाला मोजावी लागणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गेल्यावर्षी युवक राष्ट्रवादी जिल्ह्यात जोमात होती. परंतु आबांच्या जाण्यानंतर अवघ्या आठ महिन्यांच्या कालावधित युवक राष्ट्रवादीची वाताहत झाली. या युवक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आता खमक्या नेताच कोण उरला नसल्याचे चित्र आहे. आबा असतानाही युवक राष्ट्रवादीमध्ये युवकांच्या दोन राजकीय फळ्या होत्या. परंतु त्यांच्या पश्चात कोणतीच फळी औषधालाही उरली नसल्याचे जाणवत आहे.सत्तेच्या राजकारणात राज्यात, देशात भाजपचे सरकार असतानाही युवक राष्ट्रवादी विरोधी भूमिका घेऊन युवकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी रस्त्यावर उतरेल, आक्रमक भूमिका घेईल असे वाटत होते. परंतु युवक राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी या सर्व तरुणांच्या आशेवर पाणी फिरविल्याचे स्पष्ट झाले आहे.वर्षभरापूर्वी युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष ताजुद्दीन तांबोळी, जिल्हाध्यक्ष शरद लाड हे पब्लिसिटी राजकीय स्टंट करताना वारंवार दिसून यायचे. परंतु या वर्षात निराधार झाल्याने हे दोघेही युवक राष्ट्रवादीचे पदाधिकारी अज्ञातवासात गेले आहेत. ना आंदोलन, ना राजकीय स्टंट, ना पत्रकबाजी, काहीच करताना दिसून येत नाहीत. त्यामुळे तांबोळी व लाड यांच्यासह युवक राष्ट्रवादीच्या कागदावरील पदाधिकाऱ्यांना शोधण्याची वेळ आली आहे. राष्ट्रवादी पक्षात युवकांचे हाल सुरू झाल्याने तसेच हे युवक कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बेदखल केल्याने नाराज झाले आहेत. मतदारसंघातील अनेक युवक कार्यकर्ते राष्ट्रवादीला अखेरचा राम-राम करीत भाजपचे खासदार संजय पाटील गटाकडे चालल्याचे चित्र दिसत आहे, तर काही पदाधिकारी व कार्यकर्ते अद्यापही नेतृत्वाचा शोध घेताना दिसून येत आहेत.एकूणच तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातील युवक राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या परिस्थितीचा विचार केला असता, युवक राष्ट्रवादी कॉँग्रेसची परिस्थिती बिकट असल्याचेच चित्र दिसत आहे. भाजपच्या संजयकाका पाटील गटाकडे तरुणांचा कल वाढताना दिसून येत आहे. युवक राष्ट्रवादीच्या तांबोळी, लाड यांसारख्या पदाधिकाऱ्यांना शोधण्याची वेळ आली असून, त्यांचा राजकीय पत्ता सांगा अन् बक्षीस मिळवा, असे युवा कार्यकर्ते बोलू लागले आहेत. आबांच्या निधनाने तरुण कार्यकर्ते इतर पक्षांच्या वाटेवर आहेत. ज्येष्ठ नेत्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन होणाऱ्या गळतीला थांबविण्याची गरज निर्माण झाल्याचेच चित्र सध्या दिसत आहे. युवकांचे प्रश्न ‘जैसे थे’च...राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राष्ट्रवादी युवकांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरेल, अशी आशा होती. पण कोणत्याच नेत्यांनी वा कोणत्याच पदाधिकाऱ्यांनी याविषयी आवाज उठविला नाही. याचीच सल युवा कार्यक र्त्यांच्यात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. युवकांविषयी राजकीय खेळी न करता त्यांचे प्रश्न समजून घेणे गरजेचे असल्याचेही बोलले जात आहे. कार्यकर्ते दुरावण्याचे कारण असलेले युवा पिढीचे प्रश्न जैसे थेच ठेवण्यात आले आहेत.
तासगाव-कवठेमहांकाळला राष्ट्रवादी कोमात
By admin | Updated: October 13, 2015 00:09 IST