याबाबतची शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सांगली येथील एका कंपनीमध्ये डांबर खाली करून मुंबई याठिकाणी चालक मोहम्मद वकील अहमद शेख (रा. वडाळा, मुंबई) हे निघाले होते. दरम्यान, टँकर केसुर्डी, ता. खंडाळा हद्दीमध्ये एका हॉटेलवर जेवणासाठी थांबला असता पार्किंगमध्ये एक कंटेनरचालक व चालक शिवराम सुखदेव यांच्यामध्ये बाचाबाची सुरू झाली. यावेळी टँकरचालक मोहम्मद शेख हे भांडणे सोडविण्याकरिता गेले असता कंटेनरचालक राहुल माने याने शिवीगाळ करून हातामध्ये वीट डोक्यात मारून मारहाण करीत जखमी केले.
त्याचप्रमाणे सोबत असलेल्यांनाही हाताने मारहाण करून शिवीगाळ केली. यावेळी याबाबतची माहिती शिरवळ पोलिसांना मिळताच शिरवळ पोलिसांनी घटनास्थळावरून गेलेल्या कंटेनरचालक राहुल माने याच्या मुसक्या जिल्ह्याच्या सीमेवर आवळल्या. या प्रकरणी टँकरचालक मोहम्मद शेख यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून कंटेनरचालक राहुल माने याच्याविरुद्ध शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग हजारे तपास करीत आहेत.