रहिमतपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रहिमतपूरमधील सर्व कोरोना केअर सेंटरमधील बाधित रुग्णांना अत्यावश्यक सेवेसाठी तातडीने लागणारी दोन लाख रुपयांची औषध स्वरूपात मदत पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आली.
रहिमतपूर नगर परिषदेमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रांताधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार अमोल कदम, नगराध्यक्ष आनंद कोरे, मुख्याधिकारी संजीवनी दळवी, माजी नगराध्यक्ष वासुदेव माने यांच्या उपस्थितीत संस्थेच्या अध्यक्षा चित्रलेखा माने-कदम यांनी औषधांचे बॉक्स आनंदा कोरे यांच्याकडे सुपूर्त केले. रहिमतपूरसह परिसरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रहिमतपूर पालिकेच्या वतीने रहिमतपूर-ब्रम्हपुरी कोरोना सेंटर सुरू केले आहे. डॉ. वसंतदादा पाटील विद्यालय, आदर्श विद्यालय, ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, आर्ट्स, कॉमर्स व सरदार बाबासाहेब माने महाविद्यालय येथे बाधित रुग्णांसाठी संस्थात्मक विलगीकरण कक्ष सुरु करण्यात आले आहेत. या औषधांचा उपयोग सर्व रुग्णांना होणार आहे. या वेळी पालिकेच्या वतीने नगराध्यक्ष आनंदा कोरे यांनी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.
दरम्यान, कोरोनाचा संसर्ग आपल्या गावात, भागात वाढत आहे. अशा वेळी समाज कुटुंबातील घटकांना आधार देणे, मदत करणे ही आपली सामाजिक, नैतिक जबाबदारी बनली आहे, असे आवाहन चित्रलेखा माने-कदम यांनी संस्था परिवारातील सर्व कर्मचाऱ्यांना केले होते. या आवाहनास प्रतिसाद देत दोनच दिवसांत दोन लाख रुपयांची रक्कम मदत स्वरूपात जमा केली. या वेळी माजी नगराध्यक्ष अविनाश माने, नगरसेविका माधुरी भोसले, नगरसेवक शशिकांत भोसले, विद्याधर बाजारे, रमेश माने आदी नगरसेवक उपस्थित होते.