सातारा : सातारा तालुक्यातील सैदापूर येथील एका महिलेने तिच्या सासूला शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण करून पतीच्या हातावर सुरीने वार करून त्याला जखमी केल्याची घटना शुक्रवार, दि. ३ रोजी सकाळी सात वाजण्याच्यासुमारास घडली. याप्रकरणी सुनेवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
वृषाली अनुप लकडे (रा. सैदापूर, ता. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सैदापूर येथील अनिता अविनाश लकडे (वय ५२) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांचे पती अविनाश आणि मुलगा अजिंक्य हे दोघेही घरी असताना त्यांची सून वृषाली आणि मुलगा अनुप झोपेतून उठूनच अनिता यांच्या घरी आले. यावेळी वृषाली हिने घरगुती कारणावरून शिवीगाळ, दमदाटी करण्यास सुरुवात केली. वृषाली ही अनिता यांच्या अंगावर धावून गेली असता, अनुप हे भांडणे सोडविण्यासाठी मध्ये पडले. मात्र, याचवेळी वृषाली हिने घरातील किचन कट्ट्यावर असलेली सुरी घेतली आणि अनुप लकडे (वय ३२) यांच्या डाव्या आणि उजव्या हातावर मारुन त्यांना जखमी केले.
याबाबतची तक्रार अनिता यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिल्यानंतर वृषाली हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.