अपघाताचा धोका
सातारा : पुणे बंगळूर महामार्गावर वाहने थांबल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. अचानक वाहन महामार्गावर थांबत असल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या वाहनांवर वाहतूक पोलिसांनी तत्काळ करावाई करावी, अशी मागणी स्थानिक वाहनधारकांकडून होत आहे.
कार्यालयासमोर द्वारसभा
सातारा : विद्युत विधेयक मागे घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्यावतीने कृष्णानगर, सातारा येथील महावितरणाच्या कार्यालयासमोर कामबंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर द्वारसभा घेण्यात आली. यावेळी संतोष भोसले, दीपक जावळे, प्रवीण सरवदे, जिल्हाध्यक्ष रवींद्र खुंटे, अमोल तावरे, विक्रम मोरे, सचिन चव्हाण, राहुल महालिंगे, संतोश माने उपस्थित होते.
पूर्णाकृती पुतळ्याची मागणी
सातारा : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असून, साता-यात त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी अश्विन बडेकर यांनी केली आहे. सातारा शहर ऐतिहासिक आणि जिल्ह्याचे ठिकाण असल्याने येथे पुतळा उभारा, अशी मागणी करण्यात आली आहे. शहरात नव्याने होणा-या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला त्यांचे नाव देण्यात यावे, असेही निवेदनात म्हटले आहे.
पोस्टाद्वारे शुभेच्छा
सातारा : टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक विजेत्या खेळाडूंवर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भारतीय डाक विभागामार्फत उपलब्ध असलेल्या ई पोस्ट या सुविधेमार्फत नागरिकांना पदक विजेत्या खेळाडूंपर्यंत थेट शुभेच्छा पोहोच करण्याची संधी सातारा टपाल विभागाने उपलब्ध केली असल्याची माहिती प्रवर डाक अधीक्षिका अपराजिता म्रिधा यांनी दिली आहे.
मोमीन यांची निवड
सातारा : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या सातारा तालुका उपाध्यक्षपदी अतीत ता. सातारा येथील वसीम मोमीन यांची निवड करण्यात आली आहे. त्यांचा जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. योवळी आप्पासाहेब गायकवाड, गणेश गायकवाड, नीलेश गाडे, नितीन आवळे, अभिजित भोसले, उत्तमराव कांबळे, दिनकर जाधव, अवधूत थोरवडे आदी उपस्थित होते.