कुडाळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी बसच्या सर्वच फेऱ्या मर्यादित सुरू होत्या. शासनाच्या आदेशानुसार आता सर्वच व्यवहार पूर्वपदावर येत आहे. जावळी तालुक्यातील मेढा आगाराच्या ग्रामीण भागातील बसच्या फेऱ्या पूर्ववत कराव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालकांमधून जोर धरू लागली आहे.
गेली सात-आठ महिन्यांपासून बंद असलेली लालपरी आता सर्वांच्या सेवेसाठी धावू लागली आहे; मात्र ग्रामीण भागातून अजूनही पूर्वीप्रमाणे एसटीची सेवा सुरळीत सुरू नाही. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. अशातच शासनाने नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू केले आहेत. आता पाचवी ते आठवीचे वर्गही सुरू झाले आहेत. कुडाळ परिसरातील विद्यार्थी पाचवड, वाई, सातारा, भुईंज याठिकाणी शिक्षणासाठी जात असतात. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी वेळेत बसची सुविधा मिळणे आवश्यक आहे. एसटीच्या फेऱ्या कमी असल्याने शाळा, कॉलेज सुटल्यावर विद्यार्थ्यांना तासनतास बसची वाट पाहत बसावे लागते. यामुळे विद्यार्थी व प्रवाशांची हेळसांड होत आहे. अशातच एकाच गाडीला मोठी गर्दी झाल्याचेही पाहायला मिळत आहे. मेढा एसटी आगाराप्रमुखांनी याचा विचार करून ग्रामीण भागातील फेऱ्या पूर्ववत सुरू कराव्यात, अशी मागणी विद्यार्थी व नागरिकांची केली आहे.
(चौकट)
विद्यार्थ्यांना पाहावी लागतेय एसटीची वाट..
सकाळी कॉलेज व शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. सध्या भागातील हातगेघर, आखेगणी बेलावडे, डेरेवाडी, मोरघर या मुक्कामाच्या गाड्या बंद आहेत. तसेच पाचगणी ते पाचवड या मार्गावर अर्ध्या तासाच्या फरकाने सुरू असणारी फेरी दिवसातून दर दोन तासाने होत आहे. यामुळे विद्यार्थी व नागरिकांना प्रवासासाठी एसटीची वाट पाहत बसावे लागते.