दहिवडी : आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांवर अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामाचा ताण येत असल्याने माण तालुक्यातील कोरोना सीसीसी व डीसीएचसी सेंटरमधील काम न करण्याचा निर्णय माण तालुका आरोग्य संघटनेच्यावतीने घेण्यात आला आहे.
प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात संघटनेच्यावतीने म्हटले आहे की, माण तालुक्यातील आरोग्य विभागातील पन्नास टक्के जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा शासन भरत नसल्याने कामावर हजर असलेल्या कर्मचाऱ्यांवर अगोदरच कामाचा अतिरिक्त ताण येत आहे. त्यातच कोरोना सीसीसी व डीसीएचसी सेंटरमधील काम करायला लावत असल्याने कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. शासनाने आरोग्य विभागातील रिक्त असलेली रिक्त पदे तातडीने भरून कर्मचाऱ्यांवर येणारा ताण कमी करावा, माण तालुक्यातील आरोग्य सेवा विभागाच्यावतीने सर्व कर्मचाऱ्यांनी आरोग्य विभागाच्या सीसीसी व डीसीएचसीमधील अतिरिक्त ड्युटीसंदर्भात काम करणे अतिशय जिगरीचे झाले आहे. पन्नास टक्के रिक्त पदे व त्याचा कार्यभार, सलग दोन वर्षे एकही सुटी न घेता केलेले काम यामधून अतिरिक्त ताण करूनसुद्धा आता सीसीसी व डीसीएचसीमध्ये लावलेल्या ठिकाणी काम करणार नाही. तसेच सर्व कर्मचारी नियमित उपकेंद्र स्तरावरील काम करतील.
याविषयी गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन दिले आले. यावेळी अनिल काशीद, अधिक गंबरे, महादेव गंबरे, शिवराम हुलगे, गणेश लंगडे, राजू जाधव, श्रीमती दराडे, अस्लम शेख उपस्थित होते.