लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : महाराष्ट्रातील आघाडी, तिघाडी सरकार हे महिलांवर होणारे अत्याचार नुसतेच डोळे विस्फारून पाहात आहे, परंतु गुन्हेगारांवर कारवाई करताना घाबरत आहे, असा आरोप करत भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाने साताऱ्यामध्ये निदर्शने केली.
साताऱ्यातील पोवई नाका येथे भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा सुवर्णाताई पाटील आणि महिला मोर्चा सातारा जिल्हाध्यक्षा डॉ. सुरभी भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले.
संकटास घाबरून घरात बसलेल्या ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार सुरु आहेत. सरकारच्या दबावामुळे गुन्हेगारांवर कारवाई करण्याची पोलिसांची हिंमत राहिलेली नाही. त्यामुळे आता महिलांनाच आपल्या संरक्षणाची तयारी करावी लागणार आहे. घरकोंबड्या सरकारमुळेच महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार वाढले आहेत. अशी टीका भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा सुवर्णाताई पाटील आणि महिला मोर्चग जिल्हाध्यक्ष डॉ. सुरभी चव्हाण यांनी केली.
महिलांचा सन्मान राखण्यासाठी केंद्र सरकार विविध योजना आखत आहे. महिलांना मंत्रिमंडळात मानाचे स्थान मिळत आहे, तर इकडे राज्यात मात्र ठाकरे सरकारच्या निष्क्रियतेमुळे महिलांवर अत्याचारांचा कळस गाठला आहे. राज्यात गणेशात्सव सुरू होत असताना, अनेक कुटुंबं अत्याचारांच्या भयाने धास्तावली आहेत. त्यांना संरक्षण देण्यात ठाकरे सरकार कुचकामी ठरले आहे.
पुण्यात वानवडी येथे १४ वर्षांची अल्पवयीन युवती आणि २५ वर्षीय गतिमंद तरुणीवरील सामूहिक बलात्काराच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला आहे. महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलेला असताना ठाकरे सरकार मात्र कोरोनाच्या नावाने राजकारण करत निष्क्रियपणे घरात बसून आहे. पुरोगामी महाराष्ट्रातील वानवडी येथील गौरी गायकवाड नावाच्या महिला सरपंचास सताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने मारहाण केल्यानंतरही कारवाई होत नाही. उलट नागरिकांची लसीकरणाची सुविधाच बंद करून जनतेच्या जीवाशी खेळ केला जातो. औरंगाबादला उसतोड मजूर महिलेचे अपहरण केले जाते आणि सरकार मात्र हातावर हात ठेवून ढिम्म राहते. ठाण्यात पालिकेच्या अधिकारी महिलेवर भर रस्त्यात हल्ला करून तिची बोटे छाटली जातात. महाराष्ट्रात विकृत गुन्हेगारांची हिंमत वाढली असून, महिला सुरक्षेचे धिंडवडे निघाले आहेत.
यावेळी सातारा शहर महिला मोर्चा अध्यक्ष रिना भणगे, तालुका अध्यक्ष मोनाली पवार, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस मनीषा पांडे, जिल्हा उपाध्यक्ष निर्मला पाटील, जिल्हा चिटणीस सविता पवार, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुजाता कोल्हटकर, तसेच महिलांना पाठिंबा देण्यासाठी जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेठवार, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, तालुका अध्यक्ष राजेंद्र इंगळे, सातारा जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवणामे उपस्थित होते.
फोटो ओळ : सातारा येथील पोवई नाक्यावर भाजपच्या महिला मोर्चाच्या वतीने राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.