कोपर्डे हवेली : कऱ्हाड उत्तर पूर्व विभागात पंधरा दिवसांपूर्वी पडलेल्या पावसावर पेरण्या झाल्या होत्या, त्या पिकांच्या कोळपणी सुरू झाल्याचे चित्र शिवारात दिसत आहे.
कऱ्हाड उत्तरेतील पूर्व विभागात जिरायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे क्षेत्र जास्त आहे. गेल्या दोन वर्षांत शेतीच्या पाण्याची सोय झाल्याने ऊसासारखे बागायत पीक घेतले जाते तर जिरायती क्षेत्रावर खरिपातील पीक म्हणून सोयाबीन, भुईमूग, घेवडा, मूग, चवळी, उडीद, मका आदी पिके घेतली जातात. ही पिके घेण्यासाठी शेतकरी गडबड करतात, या पिकांची काढणी करून रब्बीतील शाळू पीक घेता येते.
पंधरा दिवसांपूर्वी पडलेल्या पेरणीयोग्य पावसामुळे अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या. सध्या ही पिके कोळपणीस आल्याने शेतकरी सायकलच्या कोळपाणे कोळपणी करत आहेत. कोळपणी करण्याचे दोन फायदे आहेत, त्यामध्ये पिकात तण येत नाही. शिवाय अल्प प्रमाणात पिकाला भर लागते आणि पिकाच्या वाढीस मदत होते. कोळपणी वेळेत झाल्यास आणि ठराविक दिवसात दोनवेळा कोळपणी केल्यास भांगलणाची पिकाला गरज लागत नाही. यासाठी शेतकरी कोळपणी वेळेत करण्याचा प्रयत्न करतात. सध्या पावसाने उघडीप दिल्याने कोळपणीला सुरुवात झाल्याचे चित्र शिवारात दिसत आहे.
२५ कोपर्डे हवेली
कऱ्हाड उत्तरमधील पूर्व विभागात शेतकरी कोळपणीच्या कामात व्यस्त आहेत.