पाटण तालुक्यातील आंबेघर या परिसरात अनेक गावात भुस्खलन होऊन गावेच्या गावे गाढली गेली होती. तर डोंगराचा कडाच कोसळल्याने अनेक गावांमध्ये चालत जाणेही अवघड झाले होते. त्यामुळे काहीवेळा तर दीड-दोन तास चालत जावे लागत होते. अशा परिस्थितीत एसटीची वाहतूक करणे अवघडच होते. महाबळेश्वर तालुक्यातील परिस्थितीही काही वेगळी नव्हती. केळवली, आंबेनळी घाटात दरड कोसळल्याने अनेक गावांचा एसटीचा संपर्क तुटला होता. त्यामुळे प्रतापगडाकडे जाणाऱ्या गावातील वाहतूक बंद होती. याच काळात एक व्यक्ती प्रचंड आजारी होती. मात्र रुग्णालयातही नेता येत नव्हते. त्यामुळे चक्क जेसीबीच्या समोरील खोऱ्यात बसवून पलीकडे सोडण्यात आले होते. आंबेनळी घाटातील वाहतूक आता सुरू केली असली, तरी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एसटीला फेऱ्या सुरू करण्याबाबत अद्याप पत्रव्यवहार केलेला नाही.
चौकट
आंबेनळी घाटात वाहतूक बंदच
महाबळेश्वरकडून महाडकडे जाणाऱ्या मार्गावरील आंबेनळी घाटात जुलैमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळली होती. या घाटातून हलक्या वाहनांना प्रवासासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र बांधकाम विभागाने अजूनही एसटी प्रशासनाला वाहतुकीसाठी परवानगी दिलेली नाही.
अन्य मार्गाने वाहतूक सुरू
महाबळेश्वरमधून तापोळ्याकडे एसटीची वाहतूक केली जाते. मात्र अजूनही तापोळ्यापासून आतील बाजूला जाणाऱ्या गावांमध्ये सायकलनेही जाता येत नाही. त्यामुळे एसटी महामंडळाने काही वेळेस एसटीच्या फेऱ्या वळविल्या आहेत. कास बंगल्यापर्यंत गाड्या जात आहेत. त्याचप्रमाणे पाटण तालुक्यातही अनेक मार्गावर वाहतूक वळवावी लागली आहे.
एसटीचे उत्पन्न घटले
१. महाबळेश्वर, पाटण तालुक्यातील अनेक गावे दुर्गम भागात आहेत. त्यामुळे खासगी वाहनांची संख्याही कमी आहे. त्यामुळे एसटी हेच एकमेव वाहतुकीचे साधन होते. मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे एसटीच्या फेऱ्या बंद कराव्या लागल्या.
२. महाबळेश्वर आगाराला कोरोनापूर्वी पाच ते सहा लाखांचे उत्पन्न मिळत होते. मात्र आता ते घटून चक्क एक लाखावर आले आहे. त्यामुळे एसटी अडचणीत आली आहे.
कोट
आतील वाहतूक बंदच
महाबळेश्वरपासून तापोळापर्यंत एसटीने वाहतूक केली जाते. मात्र आतील भागातील येरणा, तेटली या गावांमध्ये जाणारे रस्ते अजूनही खराबच आहेत. त्यामुळे एसटी जाऊच शकत नाही.
- नामदेव पतंगे,
आगार व्यवस्थापक, महाबळेश्वर
चौकट
गणपतीमुळे वाहतुकीवर परिणाम
सातारा विभागातून शंभर गाड्या मुंबईला देण्यात आल्या आहेत. हे करत असताना प्रत्येक आगारातून गाड्या पाठविण्याचे नियोजन केले आहे. यामुळे त्या त्या आगारातील ग्रामीण फेऱ्यांवर परिणाम झाल्याचे जाणवत आहे. मात्र शाळा-महाविद्यालय अजूनही बंद असल्याने त्यांचा फार मोठा फटका प्रवाशांना जाणवत नाही.