पूर्वनियोजित मार्गाने याव्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
नागठाणे : नागठाणे परिसरातील गावांमध्ये येणाऱ्या एसटी बसेस या आता पूर्वनियोजित मार्गाने गावाकडे याव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
सातारा एसटी बसस्थानकातून नागठाणे परिसरातील कामेरी, अंगापूर, मांडवे, पाडळी, मुरुड, तुकाईवाडी, दुर्गळवाडी आदी गावांना चालू असलेल्या एसटी बसेस महामंडळाने सातारा शहरातील ग्रेड सेपरेटरच्या चालू असलेल्या कामकाजानिमित्त विसावा नाका, अजंठा चौक तसेच शिवराज पेट्रोलपंप यामार्गे चालू केल्या होत्या. सध्या ग्रेड सेपरेटरचे कामकाज पूर्ण झाले असून, वाहतुकीसाठी रस्ता खुला करूनही देण्यात आला आहे. या आधी एसटी बसेस स्थानकातून पोवई नाकामार्गे गोडोली नाका तसेच शिवराज पेट्रोलपंपमार्गे राष्ट्रीय महामार्गावरून गावाकडे येत असत. त्यामुळे या वाहतुकीचा लाभ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनाही मिळत होता. परंतु सध्याचे दिवसात या एसटी बससाठी विद्यार्थ्यांना आणि परिसरातील नागरिकांना दररोज सातारा बसस्थानक, विसावा नाका, अजंठा चौक किंवा शिवराज पेट्रोलपंपाच्या शेजारी जाऊन थांबावे लागत आहे. त्यासाठी चांगलीच पायपीट करावी लागत आहे. यामध्ये बराच वेळ वाया जात असून, नेमक्या वेळेत गाडी भेटेल की नाही, असा ही संभ्रम निर्माण होत आहे. म्हणून परिसरातील नागरिकांनी एसटी बसेस ग्रेड सेपरेटरचा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला असल्याने पूर्ववत असणाऱ्या मार्गाने चालू कराव्यात, अशी मागणी केली आहे. याबाबत एसटी महामंडळाने सकारात्मक भूमिका घेऊन नागठाणे परिसरात येणाऱ्या बसेस पूर्ववत मार्गाने सुरू कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.