दोडामार्ग : कल्पनेच्या शिंपल्यातून, ठेविले जे स्वप्नमोती, उमलूनी सौंदर्य त्यातून, बहरली तवरूप ज्योती, स्वप्न अन् सौंदर्य जणू, साकार तव देहात आहे, या उक्तीची प्रचिती नुकतीच येथील सिंधुदुर्ग नेहरु युवा केंद्र संलग्न असलेल्या नवकिरण युवा मंच सुरूचीवाडीतर्फे आयोजित केलेल्या रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून आली. स्पर्धकांनी हूबेहूब रांगोळ्या आपल्या सर्जनशीलतेला चालना देत रेखाटल्या आणि त्या रसिकांच्या खास पसंतीच्या ठरल्या.कोकणच्या भूमीला इतिहास लाभलेला आहे. याच भूमीत संत, महात्म्ये होऊन गेले आणि त्यांच्या पदस्पर्शाने पूनित झालेल्या भूमीत वेगवेगळ्या स्वभावाचे, ढंगाचे कलांचे माणूस आढळतात. येथील संस्कृती फार प्राचीन आणि वैविध्यपूर्ण आहे. त्यामुळेच कोकणी माणसाच्या चालण्यातून, बोलण्यातून, वागण्यातून वेगवेगळया भावना प्रकट होतात. हे ही तेवढेच खरं. कोकणच्या भूमीत विविध क्षेत्रातील नामवंत कलाकार आहेत. त्यांच्या कलेला उत्तेजन देण्यासाठी आणि या संस्कृतीची जोपासना करण्यासाठी विविध मंडळे आपला सहभाग दर्शवतात. यातून रांगोळी, चित्रकला, नाट्य, संगीत आदी स्पर्धा उदयास येतात. दोडामार्गसारख्या तालुक्यातून कलाकारांना संधी आणि व्यासपीठ मिळवून देणारा प्रयत्न खरोखरच उल्लेखनीय आहे. या कलाकारांना आपल्या कला सादरीकरणासाठी येथील पिंपळेश्वर हॉलमध्ये रांगोळी स्पर्धा पार पडल्या. यामध्ये निसर्ग चित्र या विषयावर कलाकारांनी रेखाटलेल्या रांगोळ्या प्रेक्षकांना खास आकर्षण ठरल्या नाहीत तर नवलच! एकंदरीत आपल्या रांगोळी प्रदर्शनातून कलेचा उत्कृष्ट नमुने कलाकारांनी रसिकांना दाखविले. त्यांची वाटचाल दिव्यत्वाच्या प्रचितीकडे जावो हीच इच्छा यावेळी रांगोळी पाहण्याकरिता गर्दी केलेल्या रसिकांमधून व्यक्त केली जातहोती. (प्रतिनिधी)
दोडामार्गातील रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
By admin | Updated: November 9, 2014 23:26 IST