सातारा : येथील रोटरी क्लब आॅफ सातारा कॅम्प ट्रस्ट संचलित आनंदबन मतिमंद मुलांच्या व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रात शिक्षण घेणाऱ्या मुलांनी यंदा तब्बल १५ हजार दिवाळी किट बनविली आहेत. दिवाळीत ही किट जास्तीत जास्त संख्येने घेऊन सातारकरांनी या मुलांच्या विकासाला हातभार लावावा, असे आवाहन शाळेने केले आहे. नवीन औद्योगिक वसाहतीत असलेल्या ‘आनंदबन’ शाळेतील मतिमंद विद्यार्थी दरवर्षी दिवाळीला उपयुक्त असणाऱ्या वस्तूंचे किट तयार करतात. या किटच्या विक्रीतून जमा होणारी रक्कम त्यांच्या विकासासाठी उपयोगी पडते. या शाळेत ७० मतिमंद मुले-मुली शिक्षण घेतात. यावर्षी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या दिवाळी किटचे उद््घाटन कर्तव्य सोशल ग्रुपच्या अध्यक्षा वेदांतिकाराजे भोसले तसेच उद्योजक दिलीपराव उटकुर यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतेच करण्यात आले. वेदांतिकाराजेंनी मतिमंद विद्यार्थ्यांच्या कामाची पाहणी केली आणि दरवर्षीप्रमाणे दोन हजार किट खरेदी करीत असल्याचे जाहीर केले. सातारकरांनी ही किट खरेदी करण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी रोटरी क्लब आॅफ सातारा कॅम्पचे अध्यक्ष सुहास शहाणे, रोटरी ट्रस्टचे अध्यक्ष राजीव वाळवेकर, शाळा समिती अध्यक्ष अमित कदम, व्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष श्रीकांत कुलकर्णी, सचिव सुधाकर वाघोलीकर, ‘आनंदबन’च्या प्राचार्या मीरा बैरागी, दिलीप प्रभुणे, सचिन शळके, मुकेश पटेल, कौस्तुभ सातपुते, राजेंद्र पवार, संदीप सुतार पंडितराव, डॉ. खडतरे, टंकसाळे, हेमंत उपाध्ये, संतोष शेडगे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) किटमध्ये काय? दिवाळीसाठी लागणारा अंघोळीचा साबण, सुवासिक तेल, उटणे, अगरबत्ती, रांगोळी, मेणपणती, अत्तर कापूर, परफ्यूम, लक्ष्मीपूजनाचे साहित्य आदी वस्तूंचे एकत्रित किट तयार करून त्याची विक्री करण्याचा संस्थेचा उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. याखेरीज साताऱ्यातील नामवंत अशी चाळीस दुकाने व हॉटेलच्या डिस्काउंट कुपनचा समावेशही किटमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे २५० रुपयांचे हे किट अतिशय किफायतशीर ठरले आहे.
विशेष मुलांनी बनविली १५००० दिवाळी किट! ‘आनंदबन’चा उपक्रम
By admin | Updated: October 16, 2014 22:50 IST