सातारा : ‘एसपी साहेब, एक लक्षात घ्या. पळ काढणाऱ्यांपैकी मी नाही. वातावरण दूषित होऊ नये म्हणून इथून जातोय,’ अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी पोलीस यंत्रणेला इशारा दिला. शहरातील वाढत्या गुंडगिरीविरोधात निवेदन स्वीकारण्यासाठी उपोषणस्थळी येण्यास पोलीस अधीक्षकांनी ‘प्रोटोकॉल’च्या मुद्द्यावर नकार देताच ‘मीही बघून घेतो,’ असे म्हणत वीस मिनिटांत त्यांनी उपोषणस्थळ सोडले. गुंडगिरी, खंडणीखोरी रोखण्याच्या दृष्टीने खासदार उदयनराजेंनी तक्रारी मागविल्या होत्या. या तक्रारींमध्ये नावे असणाऱ्यांविरुद्ध दखलपात्र गुन्हे नोंदवावेत, या मागणीसाठी त्यांनी बुधवारी पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला होता. उपोषणास पोलीस प्रशासनाने परवानगी दिली होती; मात्र मंडप उभारण्यास परवानगी नाकारली होती. त्यामुळे अधीक्षक कार्यालयासमोरील वटवृक्षाच्या सावलीतच उपोषणाची तयारी केली होती. सकाळी साडेदहापासून उदयनराजेंचे समर्थक उपोषणस्थळी जमा झाले होते. उदयनराजे अकरा वाजून वीस मिनिटांनी उपोषणस्थळी आले, तेव्हा त्यांचा जयजयकार करणाऱ्या घोषणा समर्थकांनी दिल्या. उदयनराजेंचे छायाचित्र असलेला फलक उपोषणस्थळी लावला होता. उपनगराध्यक्षांसह सातारा विकास आघाडीचे नगरसेवक आणि कार्यकर्ते उदयनराजेंसमवेत उपोषणास बसले. दरम्यान, गुंडांविरुद्ध दखलपात्र गुन्हे दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन स्वीकारण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी उपोषणस्थळी यावे, अशी मागणी उदयनराजे आणि त्यांच्या समर्थकांनी केली. एका कार्यकर्त्याने अधीक्षकांना फोन लावला आणि तो उदयनराजेंच्या हातात दिला. काही क्षण विचार करून उदयनराजेंनी फोन घेतला. ‘प्रोटोकॉल’च्या मुद्द्यावरून आपल्याला निवेदन स्वीकारण्यासाठी उपोषणस्थळी येता येणार नाही, असे अधीक्षकांनी त्यांना सांगितले. निवेदन घेऊन कार्यालयात यावे, असे त्यांनी तिकडून सांगितले. त्यामुळे उदयनराजे संतापले.जागेवरून उठून ते रस्त्यावर आले आणि अधीक्षकांच्या कार्यालयाकडे बोट करून त्यांनी पोलीस यंत्रणेला इशारा दिला. ‘तुम्ही तुमच्या पद्धतीने जा; मी माझ्या पद्धतीने बघून घेतो,’ असे म्हणून ते मोटारीत बसले आणि अवघ्या वीस मिनिटांतच लाक्षणिक उपोषणाची सांगता झाली. उदयनराजे तेथून गेल्यानंतर सुमारे तासभर त्यांचे समर्थक, नगरसेवक उपोषणस्थळीच होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास सगळेच तेथून निघून गेले. पाऊण वाजता मागील फलक आणि कार्पेट गुंडाळले गेले. (प्रतिनिधी)वाहतूक तासभर विस्कळीतउपोषणाच्या वेळी कर्मवीर भाऊराव पथावर एकेरी वाहतूक सुरू होती. उदयनराजे आणि त्यांचे समर्थक उपोषणस्थळी पोहोचल्यावर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या दोन्ही बाजूंनी अडथळे उभे करून वाहतूक अडविण्यात आली. ‘रश अवर्स’मध्येच अनेकांना रस्ता बदलून राजपथाकडे जावे लागले. सुमारे तासभर या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. नंतर प्रथम दुचाकी आणि नंतर चारचाकी वाहनांना रस्ता खुला करण्यात आला.
एसपी साहेब... आता मी बघून घेतो!
By admin | Updated: November 12, 2014 23:56 IST