कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यातील हजारमाची येथे मुलाने वडिलांच्या डोक्यात दगड मारून त्यांच्या गळ्यावर तलवारीने वार केल्याची घटना शनिवारी घडली. आकाश संजय शिंदे (वय २४) असे हल्ला केलेल्या मुलाचे नाव आहे.याबाबत जखमी संजय दिनकर शिंदे (वय ५६) यांनी कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी मुलगा आकाश संजय शिंदे (वय २४) याच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हजारमाची येथील मळा वॉर्डमध्ये गावठी ढाब्याच्या पाठीमागे संजय शिंदे हे कुटुंबासह राहण्यास आहेत. शनिवारी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास तुम्हाला बैल व्यवस्थित सांभाळता येत नाही, असे म्हणून मुलगा आकाश याने वडील संजय यांच्या डोक्यात दगड मारून त्यांना जखमी केले. तसेच घरातून तलवार घेऊन येऊन त्याने ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या गळ्यावर वार केला. मात्र, संजय यांनी तो वार चुकवला. तलवारीचा वार कानावर बसल्यामुळे संजय शिंदे हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबतची नोंद कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात झाली आहे.
Satara Crime: ‘बैल सांभाळता येत नाही’, म्हणत वडिलांच्या डोक्यात घातला दगड, तलवारीने केला वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 14:13 IST