कातरखटाव : कातरखटाव, ता. खटाव येथे मातंग व बौद्ध वस्तीसाठी असणाऱ्या स्मशानभुमीची सध्या दयनीय अवस्था झाली आहे. याठिकाणी असणारा सिमेंट बंधारा पावसाच्या पाण्याने पूर्ण क्षमतेने भरला असल्याने स्मशानभुमीला बंधाऱ्यातील पाण्याने वेढा दिला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणी निर्माण होत असून अत्यंविधी रस्त्यावरच करावा लागत आहे. कातरखटाव येथे सिमेंट बंधारा बांधण्यात आला आहे. या बंधाऱ्याचे पाणी खोल असल्यामुळे ग्रामस्थांना पलिकडे जाता येत नाही. पावसाळ्यात या बंधाऱ्यात मुबलक पाणीसाठा होतो. त्यामुळे याठिकाणी असणारी स्मशानभूमी पाण्याखाली जाते. परिणामी पार्थिव पलिकडे न्यायचे कसे? व अंत्यसंस्कार नेमका कुठे करायचा? असे अनेक प्रश्न ग्रामस्थांपुढे उभे राहतात. या समस्येमुळे ग्रामस्थांना अंत्यसंस्कार रस्त्यावरच करावा लागतो. अंत्यविधीसाठी आलेल्या किंवा तिसऱ्याला आलेल्या लोकांना बसण्यासाठी किंवा उभे राहण्याची कसलीच व्यवस्था याठिकाणी नाही. या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरल्यामुळे अंत्यविधीसाठी आलेल्या महिलांना देखील याचा त्रास होतो.ग्रामपंचायतीने या समस्येची गंभीरतेने दखल घेऊन स्मशानभूमी दुसऱ्या ठिकाणी बांधून द्यावी अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. ग्रामपंचायतीने हा प्रश्न तत्काळ मार्गी लावल्यास पार्थिवाची हेळसांड थांबेल, अंत्यसंस्कार व्यवस्थीत पार पाडता येईल व ग्रामस्थांची पावसाळ्यात होणारी परवड देखील थांबेल असे ग्रामस्थांचे म्हणने आहे. (वार्ताहर)
बंधाऱ्याच्या पाण्याचा स्मशानभूमीला वेढा
By admin | Updated: November 11, 2014 23:26 IST