लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : आपल्या मोबाईलवर कोणतीही पोस्ट आल्यास ती वाचून उमजून न घेता अनेकजण उतावीळपणा दाखवून पोस्ट लगेच फाॅरवर्ड करतात. अशामुळे अनेकदा सायबर ॲक्टचे उल्लंघन होत असते. अशा पोस्ट लाईक, शेअर आणि फाॅरवर्ड केल्यास जेलचीही हवा खावी लागेल. कारण सायबर सेल आता प्रत्येक घडामोडीवर बारीक लक्ष ठेवून असून, क्लीक करण्यापूर्वी सावधान.
सोशल मीडियामुळे अख्ख जग आपल्या जवळ आलंय. मोबाईलच्या माध्यमातून माहितीचा खजिना आपल्या हातात आलाय. पण याच खजिन्याचा वापर करतानाही काही नियम आहेत. हे नियम पाळून आपण सोशल मीडियाचा उपयोग केला पाहिजे. पण अनेकांकडून या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असते. अश्लील व्हिडीओ फाॅरवर्ड करणे, धार्मिक भावना दुखावणे, जातीय तेढ निर्माण करणे, बदनामी करणे यासारख्या पोस्ट फाॅरवर्ड करूच नयेत. याउलट एखाद्याने अशा पोस्ट ग्रुपला फाॅरवर्ड केल्यास त्याची कानउघाडणी करा. पण त्यातूनही त्याने एकले नाही तर सायबर सेलला याची माहिती द्या. अशा लोकांवर सायबर ॲक्टनुसार गुन्हा दाखल झाल्यास त्यांना तीन वर्षांपासून सात वर्षांपर्यंत कायद्यात शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे लाईक, शेअर आणि फाॅरवर्ड करताना जपून करा.
चाैकट :
सोशल मीडियाचा वापर करा सांभाळून
अफवा पसरवू नका, कोणाचीही बदनामी करू नका.
वैयक्तिक माहिती कदापिही सोशल मीडियावर अपलोड करू नका.
बनावट लिंकद्वारे आपला डाटा चोरीला जाऊ शकतो.
चाैकट : अशी घ्या काळजी
व्हाॅट्सॲप ग्रुपवरील सर्व सदस्यांना ग्रुप स्थापन करण्यापाठीमागचे कारण सांगा. जेणेकरून तापदायक पोस्ट ग्रुपवर येणार नाहीत. एखाद्याने चुकून पोस्ट फाॅरवर्ड केल्यास त्याला पाठीशी घालू नका. तत्काळ सायबर सेलशी संपर्क साधा. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पोस्ट लाईक, शेअर करू नका.
चाैकट : मुलींनो डीपी सांभाळा
मुलींचे डीपीवरील फोटो घेऊन ते माॅर्फ करून अश्लील फोटो व व्हिडीओ तयार केले जातात. यापूर्वी अशाप्रकारच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या आहेत. त्यामुळे मुलींनी डीपी ठेवताना खबरदारी घेतली पाहिजे.
स्टेटसमध्येही आपले व्हिडीओ, फोटो ठेवू नयेत. याचाही गैरवापर होऊ शकतो.
कुटुंबासोबत फिरण्यासाठी गेेल्यानंतरचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करू नका
चाैकट : सोशल मीडियावर बदनामी; २६३ जणांवर गुन्हे
गेल्या चार वर्षांत सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी २६३ जणांवर आत्तापर्यंत गुन्हे दाखल झाले आहेत. यातील काही गुन्हे जातीय तेढ निर्माण करणारे आहेत तर काही गुन्हे बदनामी करणारे आहेत. त्याचबरोबर अश्लील फोटो पाठवून मुलींची बदनामी केल्याचे प्रकारही बरेच घडले आहेत. सध्या हे खटले न्यायप्रविष्ट आहेत.
कोट : सोशल मीडियाचा वापर करताना प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. काय लाईक करू नये आणि काय फाॅरवर्ड करू नये, याची समज प्रत्येकाला असणे गरजेचे आहे. सोशल मीडियावर आपली वैयक्तिक माहिती कधीही कोणीही अपलोड करू नये.
अजय जाधव, सायबर तज्ज्ञ, सातारा