सारंग पाटील : चिखलेवाडीत दहा बेडच्या कक्षाचे उद्घाटन
लोकमत न्यूज नेटवर्क
तळमावले : कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी संस्थात्मक विलगीकरण अत्यावश्यक असून, चिखलेवाडी ग्रामपंचायतीने लोकसहभागातून उभारलेला विलगीकरण कक्ष कोरोनाबाधित रुग्णांसाठी संजीवनी ठरेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते सारंग पाटील यांनी व्यक्त केला.
चिखलेवाडी-कुंभारगाव (ता. पाटण) येथे ग्रामपंचायत व लोकसहभागातून दहा बेडचा विलगीकरण कक्ष उभारण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन राष्ट्रवादीचे नेते सारंग पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सत्यजितसिंह पाटणकर, पाटण पंचायत समितीचे माजी उपसभापती रमेश मोरे, समाजसेवक योगेश पाटणकर, करपेवाडीचे सरपंच रमेश नावडकर, मारुती मोळावडे, सरपंच दिलीप मोरे, उपसरपंच सुदाम चव्हाण उपस्थित होते.
सारंग पाटील म्हणाले, कोरोना काळात स्वयंशिस्त, बंधने, प्रतिबंधात्मक नियमांचे पालन न करण्यामुळे असे विलगीकरण कक्ष उभारण्याची वेळ येऊ लागली आहे. मात्र, हे दुर्दैवी असून, असे कक्ष उभारण्याची वेळ येऊ नये, यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी. चिखलेवाडी ग्रामपंचायतीने उभारलेल्या विलगीकरण कक्षामुळे रुग्णांना दिलासा मिळेल.
यावेळी सत्यजितसिंह पाटणकर, रमेश मोरे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रा. सुरेश यादव यांनी प्रास्ताविक केले तर एकनाथ पाटील यांनी आभार मानले.
फोटो :
कॅप्शन : चिखलेवाडी (ता. पाटण) येथील विलगीकरण कक्षाचे उद्घाटन राष्ट्रवादीचे नेते सारंग पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी सत्यजितसिंह पाटणकर, रमेश मोरे, योगेश पाटणकर उपस्थित होते. (छाया : पोपट माने)