राष्ट्रवादीचा सोमवारी जनता दरबार
सातारा : जनतेच्या समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी आमदार शशिकांत शिंदे यांच्या पुढाकाराने सोमवार दि. १६ रोजी दुपारी १२ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने येथील राष्ट्रवादी भवनात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून हा जनता दरबार होणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी तक्रारी व समस्या सोडविण्यासाठी जनता दरबारात उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी केले.
स्वातंत्र्य दिनी खड्ड्यांत वृक्षारोपण
सातारा : गोडोली येथील साईबाबा मंदिर ते कल्याणी विद्यालय या अंतरातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मागणी करूनही त्याची दुरुस्ती केली जात नसल्याने, रविवार, दि. १५ ऑगस्ट रोजी खड्ड्यात वृक्षारोपण केले जाणार असल्याची माहिती अॅड.वैभव मोरे यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.
खिंडवाडीत वृक्षारोपण
सातारा : खिंडवाडी ता.सातारा येथील मैत्री ग्रुपच्या युवकांनी रोज सकाळी संध्याकाळ फिरायला येण्याच्या निमित्ताने डोंगर व माळरान येण्याच्या निमित्ताने डोंगर व माळरान परिसरात ५०० विविध प्रकारच्या फळरोपांचे रोपण केले असून, त्यांची जोपासना करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
लोकगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन
सातारा : क्रांती थिएटर्स व एबीएसएस मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता वसंत भोजनालय येथे लोकगीतांच्या कार्यक्रमाचे अयोजन केले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन पालिकेचे उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांच्या हस्ते होणार आहे. संयोजनासाठी अमर गायकवाड, भगवान अवघडे, राजीव मुळ्ये, प्रा.अनिल जगताप, शशिकांत गाडे आदींनी परिश्रम घेतले.