सातारा : पहिला आणि दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये पती वर्क फ्रॉम होमच्या निमित्ताने २४ तास घरातच होता. त्यामुळे पती-पत्नीमध्ये वादाचे प्रसंग अनेकदा उद्भवले तर काही प्रकार थेट भरोसा सेलमध्ये सामोपचारासाठी आले. पती-पत्नीमध्ये सातत्याने होणारा गैरसमज, शंका आणि आर्थिक चणचण ही वैवाहिक जीवनात विष कालवण्याची प्रमुख कारणे समोर आली आहेत.
कोरोनाचा शिरकाव होण्यापूर्वी रोज सकाळी घरातून बाहेर पडणारे लोक रात्री काम संपवून घरी येत होते. सतत कामांमध्ये व्यस्त असायचे. कधीकधी घरातल्यांना वेळ देता येत नव्हता. सहा महिन्यांतून फार फार तर दोन तीन दिवस सुट्टी काढून अनेक जण पत्नीला अथवा कुटुंबाला वेळ देत होते. पण जेव्हा कोरोनाने शिरकाव केला तेव्हा माणसाचं आयुष्यमान बदलून टाकलं. चोवीस तास घराबाहेर असणारा पती जेव्हा २४ तास घरात राहू लागला, तेव्हा एकमेकांचे स्वभाव अधिकच समजू लागले. दिवसभर घरातच असल्याने पतीचा हस्तक्षेप घरात मोठ्या प्रमाणात वाढला. छोट्या छोट्या गोष्टीवर पतीचे सल्ले ऐकून पत्नी चिडचिड्या झाल्या. त्यातच अनेकांची एकत्र कुटुंब असल्यामुळे वादावादीचे प्रसंग बरेच घडले. आपल्याबद्दल आपल्या पाठीमागे कोणी काहीतरी बोलतेय, हा सातत्याने होणारा गैरसमज पती-पत्नीमध्ये वादाचे कारण बनला. आताच पत्नीला सातत्याने येणारे फोन, पतीची विचारणा आणि लाॅकडाऊनमुळे गेलेली पतीची नोकरी यामुळे कौटुंबिक कलह वाढले. मात्र काही मोजकेच कलह भरोसा सेलमध्ये दाखल झाले. त्याचे कारण म्हणजे दळणवळणाची सोय नसल्यामुळे लोकांना भरोसा सेलमध्ये येणे शक्य होत नव्हते. जे भरोसा सेलमध्ये सामोपचारासाठी आले, त्यांचा संसार पुन्हा फुलवण्यात भरोसा सेलला यश आलेय.
लॉकडाऊनमध्ये अनेक पतींची नोकरी गेल्यामुळे घरात प्रचंड आर्थिक टंचाई. त्यामुळे सातत्याने पत्नीची होणारी चिडचिड वादावादीला कारणीभूत ठरली.
चौकट: गैरसमजुती हेच कारण
भरोसा सेलमध्ये पती-पत्नीच्या वादाच्या तक्रारी लाॅकडाऊनमध्ये बऱ्याच आल्या. यातील बहुतांश तक्रारी या गैरसमजुतीतून असल्याचे समोर आले. पत्नी म्हणतेय, पतीचे बाहेर काहीतरी सुरू आहे, तर पती म्हणतोय, पत्नीचेही बाहेर कुठे काहीतरी सुरू आहे. एकमेकावर पती-पत्नी अशा प्रकारच्या गैरसमजुतीमधून शंका घेत असल्याचे सातत्याने पुढे आले. यावर उपाय म्हणून भरोसा सेलमध्ये दोघा पती-पत्नींना समोरासमोर बसून त्यांचे गैरसमज दूर करण्यात आले. केवळ अशा प्रकारच्या शंका घेऊन आपले कौटुंबिक जीवन आणि आपल्या मुलाबाळांचे आयुष्य आपण उद्ध्वस्त करत आहात याची जाणीव दाम्पत्याला करून देण्यात येत होती. त्यामुळे अनेकांचे संसार वाचले गेले.
चौकट: अन् पुन्हा संसार फुलला!
पती घरात किरकोळ कारणावरून सातत्याने शिवीगाळ करतो, अशी एक तक्रार भरोसा सेलमध्ये आली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने तिथल्या कर्मचाऱ्यांनी पतीला भरोसा सेलमध्ये बोलावले. त्याला समजावून विचारल्यानंतर त्याच्या ऑफिसमधील तणाव, त्याच्या कामामुळे तो चिडचिडा झाला होता. मात्र त्याचा परिणाम त्याच्या कुटुंबावर जाणवू लागला, हे त्याला भरोसा सेलमधील अधिकारी व महिला कर्मचाऱ्यांनी पटवून दिले. त्यानेही आपली चूक कबूल केली. तुटण्याच्या मार्गावर असणारा हा संसार पुन्हा फुलला.
पैसा हे कारण
पती-पत्नीच्या भांडणांमध्ये पैसा हे एक कारण होते. पतीची लाॅकडाऊनमुळे नोकरी गेलेली. त्यामुळे घरात आर्थिक टंचाई. यामुळेही पती-पत्नीचे वाद वाढत होते. सासू सासरे यांचेही पती-पत्नीच्या वादांमध्ये हस्तक्षेप. त्यामुळे वाद टोकाला जात होते. भरोसा सेलने हे वाद अत्यंत संयमाने सोडून अनेकांचे संसार पुन्हा जोडले.
चौकट : १६७ पती-पत्नीचे भांडण सोडवले
भरोसा सेलमध्ये लॉकडाउनच्या काळामध्ये २०८ इतक्या तक्रारी आल्या. त्यापैकी १६७ पती-पत्नीचे भांडण भरोसा सेलच्या महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने सोडवले. लॉकडाऊनमुळे लोकांना भरोसा सेलमध्ये येण्यासाठी वाहने नव्हती. त्यामुळे आता ४१ पेंडिंग राहिलेल्या तक्रारी सोडवण्यावर भरोसा सेलच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भर दिला आहे. येत्या काही दिवसांत या पेंडिंग तक्रारीही सोडवल्या जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
कोट: भरोसा सेलमध्ये तक्रार आल्यानंतर आम्ही पती-पत्नीला सर्व माहिती घेऊन त्यांच्याशी मनमोकळ्या चर्चा करतो. सामाजिक भान, नुकसान आणि मुलाबाळांचे जीवनाचा प्रश्न, हे मुद्दे विचारात घेऊन त्यांचे चांगल्या पद्धतीने सामोपचार केले जाते. अद्यापही कोणाच्या घरात अशा प्रकारे कौटुंबिक कलह असतील तर महिलांनी भरोसा सेलमध्ये येऊन आपली तक्रार नोंदवावी.
अनिता आमंदे- मेणकर, सहायक पोलीस निरीक्षक, भरोसा सेल प्रमुख सातारा
चौकट :
भरोसा सेलमध्ये मार्च २०२० पासून आलेल्या एकूण तक्रारी- २०८
दुसऱ्या लॉकडाऊनच्या काळात आलेल्या तक्रारी- ५७