मलकापूर : सत्यजित ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित वारुंजी या पतसंस्थेने सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात एकशे दहा कोटींच्या व्यवसायाची भरारी घेतली आहे. चालू आर्थिक वर्षात संस्थेला एक कोटी बत्तीस लाखांचा नफा झाला आहे. अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील यांनी दिली.
पाटील म्हणाले, सत्यजित पतसंस्थेच्या वारुंजी, कार्वे नाका, रविवार पेठ कराड व मुंढे या चार शाखांतून ग्राहकांना विनम्र सेवा दिली जाते. संस्थेच्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवीवर राष्ट्रीयीकृत बँकेची बँक गॅरंटी दिली जात आहे. संस्थेचे भागभांडवल पाच कोटी दहा लाख इतके झाले आहे. संस्थेने सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात एकशे दहा कोटींचा एकत्रित व्यवसाय केला आहे. त्यामुळे संस्थेने कोरोना काळातही व्यवसायात चांगली भरारी घेतली असून, चालू आर्थिक वर्षात एक कोटी बत्तीस लाख इतका नफा झाला आहे. संस्था ठेवीदारांना एक वर्षे व त्यापुढील मुदतीसाठी दहा टक्के व्याज देत असून याच मदतीसाठी ज्येष्ठ नागरिकांना साडेदहा टक्के व्याज दिले जाते. संस्थेतून सोने तारण कर्ज व्हॅल्युएशनच्या शंभर टक्के दिले जाते. होम लोन साठी १२ टक्के तर कॅश क्रेडिटसाठी तेरा टक्के व्याजाने अर्थपुरवठा केला जातो. इतर कर्जांसाठी १४ टक्के व्याज आकारणी होत असल्याची माहितीही नामदेव पाटील यांनी दिली. (वा. प्र.)