सातारा : सातारा येथील ऐतिहासिक आणि वैभवशाली शाही दसरा महोत्सवाला ‘राज्य महोत्सवा’चा दर्जा देऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी दिली. या निर्णयामुळे साताऱ्याच्या सांस्कृतिक परंपरेला अधिकृत मान्यता मिळून महोत्सवाचे महत्त्व अधिक वाढणार आहे.गेल्या अनेक वर्षांपासून सातारा शहराची ओळख असलेल्या या महोत्सवाला राज्यस्तरावर अधिकृत स्थान मिळावे यासाठी लोकप्रतिनिधी प्रयत्नशील होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे व आमदार महेश शिंदे यांनी सातारा जिल्ह्याच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे याबाबत लेखी मागणी केली होती. ही मागणी घेऊन महायुतीचे सातारा जिल्हा समन्वयक सुनील काटकर यांनी नुकतीच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीत, मुख्यमंत्र्यांनी या महोत्सवाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन त्याला ‘राज्य महोत्सवा’चा दर्जा देण्याची ग्वाही दिली.पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी यापूर्वीच शाही दसरा महोत्सवासाठी पर्यटन आणि जिल्हा नियोजनमधून भरीव निधी देण्याची ग्वाही दिली होती. तसेच, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनीही या मागणीसाठी सहकार्य केल्याने हा निर्णय लवकर होऊ शकला. या महोत्सवाच्या माध्यमातून शहराची ऐतिहासिक व सांस्कृतिक ओळख अधिक ठळक होईल.या भेटीवेळी काका धुमाळ, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी, भाजप युवा मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्रावण जंगम, तेजस जगताप, भाजपा सोशल मीडिया जिल्हा संयोजक रवींद्र लाहोटी, प्रवीण कणसे, आदी उपस्थित होते.
सातारच्या शाही दसऱ्याला राज्य महोत्सव दर्जा देणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 13:50 IST