सातारा : अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी साताऱ्याची बाजारपेठ गजबजूून गेली आहे. शहरासह ग्रामीण भागातील नागरिक खरेदीसाठी मोठ्या संख्येने बाजारपेठेत येत आहेत. गेल्यावर्षी संचारबंदीमुळे व्यापारी व विक्रेत्यांचे प्रचंड नुकसान झाले. यंदा बाजारपेठ खुली केल्याने व्यापाऱ्यांचे चेहरे आनंदाने खुलले आहेत.
गेल्या दोन वर्षांपासूून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागूू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे सण, उत्सवांवर निर्बंध घालण्यात आले होते. कोरोना संक्रमण कमी होताच निर्बंध देखील शिथिल करण्यात आले. उद्योग, व्यवसाय सुरू झाले. बाजारपेठ खुली करण्यात आली; परंतु सण, उत्सवांवरील निर्बंध अद्यापही कायम ठेवण्यात आले आहेत. अवघ्या काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवासाठी जिल्हा प्रशासनाने यंदाही नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसारच गणेशोत्सव साजरा करावा लागणार आहे. परंतु यंदा बाजारपेठ पूर्ण क्षमतेने खुली केल्याने व्यापारी, विक्रेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
गौरी व गणपतीच्या प्रतिष्ठापनेसाठी लागणाऱ्या विविध वस्तू, सजावटीचे साहित्य, लाकडांपासून बनविण्यात आलेले मखर, शोभेच्या वस्तू, विजेच्या माळा अशा वस्तूंची बाजारपेठेत मोठी आवक झाली आहे. या वस्तूंच्या खरेदी-विक्रीतून दररोज कोट्यवधींची उलाढाल होऊ लागली आहे.
(चौकट)
नियमांचे पालन गरजेचे
शहरासह ग्रामीण भागातील नागरिक दररोज खरेदीसाठी येत असल्याने बाजारपेठ गर्दीने गजबजून जात आहे. दरम्यान, बहुतांश नागरिक व दुकानदार कोरोना नियमावलीचे पालन करीत असले तरी, कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. त्यामुळे उत्सव काळात मास्कचा वापर करणे, फिजिकल डिस्टन्सचे पालन करणे गरजेचे आहे.
फोटो : ०५ जावेद खान
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साताऱ्याची बाजारपेठ गजबजून गेली आहे. शहरी व ग्रामीण भागातील नागरिक खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. (छाया : जावेद खान)