सागर गुजर
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये अक्षरशः कहर झाला. रुग्णवाढीचा दर ४० टक्क्यांच्या वर गेला होता. तो आता आटोक्यात येत असल्याचे चित्र असले तरीदेखील अजूनही धोक्याची पातळी कायम आहे. रुग्णवाढीचा सध्याचा दर १४.५१ टक्के असून जिल्ह्यावर रेडझोनचे सावट कायम आहे.
दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली तर एप्रिल महिन्यापासून हजारात रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे एका दिवसाला अडीच हजारांवर बाधित सापडले. सातारा तालुक्यात कोरोनाबाधित मृतांची संख्या मोठी आहे. मे महिन्यात १० हजार ५८ बाधित सापडले तर २५५ जणांचा मृत्यू झाला. फलटणमध्ये ९ हजार ६९७ रुग्ण मे महिन्यात सापडले. खटाव तालुक्यात ५ हजार ९६७ रुग्ण सापडले.
मे महिन्यामध्ये सातारा तालुक्यात २५५, कऱ्हाडमध्ये १८२, फलटणमध्ये ५७, माणमध्ये ६०, खटावमध्ये १४६, कोरेगावमध्ये ७३, पाटणमध्ये ३६, वाईमध्ये १०४, जावळीत ६०, महाबळेश्वरमध्ये १० आणि खंडाळ्यात ४९ इतक्या बाधित रुग्णांना जीव गमवावा लागला. जिल्ह्यामध्ये बाधितांचे मृत्यू रोखण्यात प्रशासन पुरते अपयशी ठरले आहे. या परिस्थितीमध्ये निर्बंध उठतील अशी परिस्थिती नाही.
चौकट
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाकडे जनतेचे लक्ष
सातारा जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या मोठी असल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी निर्बंध लागू केले आहेत. ८ जूनपर्यंत या निर्बंधांना मुदतवाढ दिली आहे. सलग सोळा दिवसांपासून किराणा माल दुकाने, मंडई बंद आहे. घरपोच किराणा माल मिळत नसल्याने सामान्यांची कोंडी झालेली आहे. आठ तारखेनंतर निर्बंध वाढले तर खायचे काय, अशी चिंता सामान्य जनतेला असून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाकडे त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
लसीकरण मोहीम वेगाने राबवण्याची गरज
जिल्ह्यामध्ये लसीकरण मोहिमेला म्हणावी तेवढी गती अजून लाभलेली नाही. जिल्ह्याच्या लोकसंख्येची व्याप्ती लक्षात घेऊन लसीकरण केंद्रे वाढवण्याची आणि लसींची संख्या वाढविण्याची गरज आहे. शासनाकडून मोठ्या प्रमाणावर लसी मिळाल्या तर कोरोनाचा संसर्ग रोखणे शक्य होऊ शकेल.
शिक्क्यांविनाच फिरतायत कोरोनाचे एक्के
कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी जिल्ह्याबाहेरून आलेल्या लोकांच्या हातावर क्वारंटाईनचे शिक्के मारले जात होते. दुसऱ्या लाटेत मात्र प्रशासन ढिले पडले. संशयित रुग्णांची तपासणी केल्यानंतर ते बाधित आढळले तरीदेखील त्यांच्या हातावर क्वारंटाईनचे शिक्के मारले गेले नाहीत. बाधित रुग्ण इतर लोकांच्या संपर्कात आल्याने संसर्ग वाढला; परंतु अद्याप देखील प्रशासनाला याचे गांभीर्य नाही. शिक्क्यांविनाच फिरतायत कोरोनाचे एक्के अशी परिस्थिती असून स्थानिक स्वराज्य संस्थेला देखील याचे सोयरसुतक राहिलेले दिसत नाही.