सातारा : जिल्ह्यात दरोडा, जबरी चोरी, सोनसाखळी हिसकावणाऱ्या टोळीतील दोघा दरोडेखोरांना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून, यात चोरीचे सोने खरेदी करणाऱ्या दोन सराफांनाही पोलिसांनी अटक केली आहे. संशयित दरोडेखोरांकडून तब्बल ५२ तोळ्यांचे ५२ लाखांचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत.सचिन यंत्र्या भोसले (वय ३०, रा. फडतरवाडी, ता. सातारा), नदीम धमेंद्र काळे (वय २२, रा. तुळजापूर, ता. वाळवा, सांगली) अशी दरोडेखोरांची, तर आशिष चंदुलाल गांधी (वय ३९, रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव), संतोष जगन्नाथ घाडगे (वय ४८, रा. देगाव, ता. सातारा) अशी पोलिसांनी अटक केलेल्या सराफ व्यावसायिकांची नावे आहेत.सराईत आरोपी सचिन भोसले हा त्याच्या सात साथीदारांसोबत सातारा जिल्ह्यात दरोडा, चेनस्नॅचिंग, घरफोडी असे गुन्हे करत होता. तो जिहे, ता. सातारा येथे अधूनमधून येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्याच्या मागावर पोलिसांची दोन पथके तेथे वेशांतर करून पाठविण्यात आली. त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली. ७ जुलैला तो घरी आला होता. मात्र, पोलिस आल्याचा सुगावा लागताच तो दुचाकीवरून पळून जाऊ लागला. पोलिसांनी दुचाकीवरून पाठलाग करत त्याला अखेर पकडले. कसून चाैकशी केल्यानंतर त्याने व त्याच्या टोळीने तब्बल २३ घरफोड्या केल्याची कबुली पोलिसांना दिली.मसूर, उंब्रज, कऱ्हाड, फलटण, सातारा तालुका, लोणंद, खंडाळा आदी ठिकाणी त्याच्या टोळीवर गुन्हे दाखल आहेत. हे सर्व गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले. ज्या दुकानात चोरीचे दागिने विकले. त्या सराफांची नावे पोलिसांना त्याने सांगितली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या एका साथीदारासह दोन सराफांनाही अटक केली. या दोन दरोडेखोरांकडून ५२ तोळे १ ग्रॅम ५३० मिली (अर्धा किलो) वजनाचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले. चालू बाजार भावाप्रमाणे या दागिन्यांची किंमत ५२ लाख आहे.ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रोहित फार्णे, पोलिस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, परितोष दातीर, विश्वनाथ संकपाळ, साबिर मुल्ला, विजय कांबळे, मंगेश महाडिक, अमोल माने, अजित कर्णे, जयवंत खांडके, प्रवीण कांबळे, स्वप्निल दाैंड, प्रवीण पवार, धीरज महाडिक, वैभव सावंत आदींनी या कारवाईत भाग घेतला.ही गुन्ह्यांची जंत्री१ दरोडा, ८ चेनस्नॅचिंग, ३ जबरी चोरी, ८ घरफोडी अन् ३ इतर चोरीचे असे एकूण २३ गंभीर गुन्हे करणारी टोळी पोलिसांनी निष्पन्न करून त्यातील दोघांना अटक केली तर सात जण अद्याप फरार आहेत.
Satara: चोरीचे सोने खरेदी करणे आले अंगलट; दोन दरोडेखोरांसह सराफ व्यावसायिक गजाआड, तब्बल ५२ तोळे सोने जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 13:52 IST