प्रमोद सुकरेकऱ्हाड: संघटन पर्वत २ अंतर्गत सध्या जिल्ह्यात भाजपचे काम सुरू आहे. त्या अंतर्गत जिल्हाध्यक्ष निवड प्रक्रिया सुरू असून सोमवारी साताऱ्यात याबाबत प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे व निरिक्षक आमदार हेमंत राहणे यांचेकडून इच्छुकांच्या मुलाखती आणि प्रमुख नेते पदाधिकारी यांची मते जाणून घेण्यात आली. आता तयार झालेले बंद लोखंडे २ मे ला वरिष्ठांसमोर फोडले जाणार असून त्यावेळेस नवीन जिल्हाध्यक्ष कोण हे स्पष्ट होईल. पण जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती आणि इच्छुकांची वाढती संख्या पाहता सातारलाही २ जिल्हाध्यक्ष होऊ शकतात अशा चर्चा आता भाजप कार्यकर्त्यांच्यात सुरू झालेल्या आहेत.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने संघटन पर्वत २ च्या माध्यमातून राज्यात सामान्य व क्रियाशील सभासद नोंदणी मोठ्या प्रमाणात केली. त्यातून बुथ कमेट्या स्थापन झाल्या. प्रत्येक १०० बुथचे एक मंडल तयार करून त्याचा एक अध्यक्ष केल्याने प्रत्येक विधानसभा मतदारसंघाला आता दोन पेक्षा जास्त तालुकाध्यक्ष मिळाले आहेत. यानंतर आता जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
सोमवारी साताऱ्यात भाजपचे वरिष्ठ निरीक्षक आले. त्यांनी आमदार, खासदार, विविध पदाधिकारी यांची मते जाणून घेतली. भाजपचा जिल्हाध्यक्ष कोण असावा? याबाबत प्रत्येकाकडून पसंती क्रमाने तीन नावे लिहून घेतली. तसेच इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. आता हे बंद केलेले लखोटे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे दिले जाणार असून तेथेच जिल्हाध्यक्षाचे नाव निश्चित होणार आहे. मात्र तोवर इच्छुकांची धावणूक वाढली आहे हे मात्र निश्चित!
सातारा जिल्हा हा भौगोलिक दृष्ट्या शिरवळ पासून मालखेड पर्यंत विस्तारला आहे. याचा भूभाग फार मोठा आहे. त्यामुळे तेथील कामकाज चांगल्या पद्धतीने करता यावे यासाठी इतर अनेक पक्षांनी विभागवार येथे २/३ जिल्हाध्यक्ष नेमले आहेत. त्याच पद्धतीने भाजपमध्येही कामाच्या सोयिसाठी २ जिल्हाध्यक्ष केले जावेत अशा प्रकारचा सूर पदाधिकारी प्रमुख कार्यकर्ते यांनी पक्ष निरीक्षकांच्या समोर आळवल्याचे समजते. त्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या, प्रमुख कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेऊन वरिष्ठ त्यावर योग्य तोडगा काढणार का? सातारालाही भाजप २ जिल्हाध्यक्ष देणार का? हे पाहावे लागणार आहे.
महिलाही आल्या स्पर्धेत खरंतर गेल्या महिन्याभरापासून सातारचा भाजपचा जिल्हाध्यक्ष कोण? याच्या चर्चा सगळीकडे सुरू आहेत. धैर्यशील कदम, सुनील काटकर, रामकृष्ण वेताळ आदींची नावे समोर आली आहेत. पण जिल्हाध्यक्ष निवडीत अनुसूचित जाती ,अनुसूचित जमाती व महिलांना २५ टक्के प्रतिनिधित्व देण्याचे भाजपचे धोरण असल्याने सातारच्या मुलाखती दरम्यान चित्रलेखा माने व सुवर्णा पाटील यांनी देखील आपण इच्छुक असल्याचे सांगितले आहे. आता साताऱ्यात महिलांना संधी मिळणार का? हे देखील पहावे लागेल.
इतर जिल्ह्यात नेमकी परिस्थिती तरी काय? भाजपच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात सध्या जिल्हाध्यक्ष निवड प्रक्रिया सुरू आहे. पण याबाबत नजीकच्या जिल्ह्याचा आढावा घेतला तर सांगलीमध्ये भाजपचे ३ जिल्हाध्यक्ष, सोलापूरमध्ये भाजपचे ३ जिल्हाध्यक्ष तर कोल्हापूरला भाजपचे तब्बल ४ जिल्हाध्यक्ष आहेत.मग सातारला २ जिल्हाध्यक्ष का नको असाही सूर आता समोर आला आहे.
साताऱ्यात इतर पक्षांची काय स्थिती?सातारा जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता राजकीय दृष्ट्या काम करणे सोपे व्हावे म्हणून अनेक पक्षांनी २/३ जिल्हाध्यक्ष निवडले आहेत. त्यात शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा उल्लेख आवर्जून करावा लागेल.मग भाजप देखील कामाच्या सोयिसाठी असा निर्णय घेणार का याकडे भाजपवाशियांचे लक्ष लागून आहे.