सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के इतके मतदान झाले. तिसऱ्या टप्प्यात मंगळवारी सातारा, माढा लोकसभा मतदार संघासाठी मतदान सुरू झाले. दुपारी तीन वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के इतके तर सकाळी अकरा वाजेपर्यंत सातारा मतदार संघात साडेसतरा टक्के मतदान झाले. अनेक ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाले त्यामुळे संथगतीने मतदान सुरू होते. माढा विधानसभा मतदार संघात दुपारी तीन वाजेपर्यंत ४६.५७ टक्के मतदान झाले.
ईव्हीएमच्या बिघाडामुळे मतदान प्रक्रिया ठप्प
माढा लोकसभा मतदार संघातील आसनगाव, ता. कोरेगाव येथील मतदान केंद्रात मंगळवारी सकाळी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने दहा वाजेपर्यंत मतदान सुरू झाले नव्हते. आज दुपारी ३ पर्यंत माढा ४४.१० टक्के आणि फलटण ४५.४० टक्के मतदान झाले. आज दुपारी 4.30 पर्यंत जिंती येथील ५०% मतदान झाले .महादेव जानकर यांनी पळसावडे ता.माण येथे मतदानाचा हक्क बजावला,
माढा लोकसभा मतदार संघामध्ये सोलापूर जिल्ह्यामधील माढा, करमाळा, सांगोला, माळशिरस आणि सातारा जिल्ह्यातील फलटण व माण या सहा विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. मतदार संघात सर्वत्र मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू असताना फलटण विधानसभा मतदार संघातील आसनगाव, ता. कोरगाव येथील मतदान केंद्रात सकाळी सात वाजल्यापासून ईव्हीएम मशीनच सुरू झाली नाही.
एका वृद्धाने पहिले मतदान करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती प्रक्रिया पूर्ण न झाल्याने मतदान केंद्र अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाहणी केली असता ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी मंडल व फलटण विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.
दरम्यान, मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. मतदारांनी मतदान प्रक्रियेबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. काही वेळाने भरारी पथकाने मतदान केंद्रास भेट देऊन अतिरिक्त असलेली नवीन ईव्हीएम मशीन जोडून प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे मतदान केंद्रावर सुमारे तीन तास एकही मतदान होऊ शकले नाही. त्यामुळे या मतदान केंद्रात मतदानाची टक्केवारी कमी होण्याची शक्यता आहे.
वाई मतदारसंघात ३ वाजेपर्यंत ४४ टक्के मतदान झाले. दुपारी एक पर्यंत ५ लाख ८७ हजार ६६४ मतदारांनी आपला हक्क बजावला. या मतदारसंघात एकूण १८ लाख ३८ हजार १३९ इतके मतदान आहे. मतदारसंघात ११ वाजेपर्यंत म्हणजेच सुरुवातीच्या ४ तासात १७.५० टक्के मतदान झाले होते.
सातारा जिल्ह्यात अकरा वाजेपर्यंत साडेसतरा टक्के मतदान
सातारा जिल्ह्यातील २,२९६ मतदान केंद्रावर मंगळवारी सकाळी मतदानास सुरुवात झाली. सातारा मतदार संघातून नऊ उमेदवार नशीब आजमावत आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातील अनंत इंग्लिश स्कूल, नरेंद्र पाटील यांनी पाटण तालुक्यातील मंद्र्रुळकोळे, माढा लोकसभा मतदार संघातील उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी फलटण, मंत्री महादेव जानकर यांनी माण तालुक्यातील पळसावडे, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी पाटण तालुक्यातील मारुल हवेली, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कऱ्हाड येथे मतदानाचा हक्क बजावला.
कऱ्हाड तालुक्यातील कालगाव येथे मतदान केंद्रावर मतदान मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे सकाळी आठपर्यंत मतदान थांबले. या ठिकाणी ताटकळत उभे राहण्याची वेळ मतदारांवर आली. तीन मशीन बदलल्या तरीही मतदान यंत्रणा सुरळीत झाली नव्हती.
सुरुवातीला खा. उदयनराजेंच्या घरच्या मैदानावर सातारा विधानसभा मतदार संघात सर्वात कमी १४.१७ तर, शिवसेना उमेदवार नरेंद्र पाटील यांचे पाटण विधानसभा क्षेत्रात १८.१० टक्के मतदान झाले होते. कोरेगाव विधानसभा मतदार संघात सर्वाधिक १९.६३ पाठोपाठ कऱ्हाड उत्तर १९.३२, कऱ्हाड दक्षिण १७.४० तर वाई विधानसभा मतदार संघात १६.९१ टक्के मतदान झाले.
विधानसभा निहाय मतदान असे दुपारी १ पर्यंतवाई - ३१.८१ टक्के, कोरेगाव :३३.५५ , कऱ्हाड उत्तर : ३२.२८, कऱ्हाड दक्षिण :३२.४७, पाटण : ३१.४७, सातारा : ३0.३९ टक्के मतदान झाले.