जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे हे एकत्र असताना एकमेकांसाठी पूरक काम करत होते. खासदार उदयनराजेंच्या प्रचारासाठी जशी शिवेंद्रराजेंनी मदत केली तसाच शशिकांत शिंदेंनीही प्रचार केला. एकमेकांचा राजकीय मार्ग सुकर व्हावा, यासाठी ही पेरणी होती. पण, विधानसभेत त्याला फळ मिळालेच नसल्याचे शशिकांत शिंदेंचे म्हणणे आहे. तर आम्ही मदत केली होती, असा शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा दावा आहे.
कोरेगाव मतदारसंघ हा आता शशिकांत शिंदेंसाठी तेवढा सुरक्षित राहिलेला नाही. त्यामुळे भविष्यात ते सातारा - जावळी मतदार संघातून उभे राहू शकतात. असे झाले तर दोन्ही नेत्यांमध्ये संघर्ष होणार आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या माध्यमातून ही परिस्थिती दिसून येईलच. त्याच्याही अगोदर जिल्हा बँक आणि साखर कारखान्यांमध्येही संघर्ष पाहायला मिळणार आहे. नेत्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे प्रत्येकाची धडपड सुरु राहणारच पण त्यासाठीची स्पर्धा खूपच संघर्षमय असणार आहे. त्याची तयारी दोन्ही नेत्यांनी केली असली तरी अनेकांच्या उड्या त्यामध्ये पडणार आहेत.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केवळ कार्यकर्त्यांना खूश करण्यासाठी हे वक्तव्य केले आहे की, शशिकांत शिंदेंना इशारा म्हणून दिले आहे, याचा अर्थ प्रत्येकाने आपल्यापरीने काढायला सुरुवात केली आहे. अजित पवारांनी तर याची फार गांभीर्याने दखल घेण्याची आवश्यकता नाही, असे म्हटले आहे. त्यामुळे नेमके खरे कोणाचे, हादेखील प्रश्न पडतो आहे. नेत्यांच्या भाषणाने कार्यकर्ते खूश झाले असले तरी त्यांच्यामध्ये सत्यता किती आहे, याचाही विचार होण्याची आवश्यकता आहे. शिवेंद्रसिंहराजे असे कधीही कोणाला खूश करण्यासाठी बोलत नाहीत. कारण, त्यांनी आपल्या वडिलांचा दिवंगत अभयसिंहराजे भोसले यांची शिकवण दिलेला शब्द पाळण्याची असल्याचे यावेळी सांगितल्याने ते याबाबत गंभीर असल्याचेच दिसते.
कोरेगावमध्ये शशिकांत शिंदे यांच्याविरोधात निवडून आलेल्या महेश शिंदे यांचा वारू सध्या चौफेर उधळत आहे. त्यामुळे याठिकाणी टिकून राहण्यासाठी शशिकांत शिंदे यांना खूपच मेहनत करावी लागणार आहे. सातारा - जावळी हा मतदारसंघदेखील त्यांच्यासाठी तेवढा सोपा नाही. मात्र, घरचा मतदारसंघ म्हणून ते दावा करु शकतात आणि बाहेरची व्यक्ती आहे म्हणून कोणीही हिणवू शकत नाही, ही त्यांच्या दृष्टीने जमेची बाजू आहे. सातारा तालुक्यात शिवेंद्रसिंहराजेंची जोरदार बांधणी आहे. त्यामुळे त्यांना या मतदार संघातूनही मोठा संघर्ष करावा लागणार आहे. पण, त्याची मानसिकता त्यांनी आत्तापासूनच करण्याचे नियोजन केलेले दिसते. त्यामुळे पक्षासाठी संघर्षाची तयारी ठेवण्याची भाषा त्यांनीही वापरली आहे. काही झाले तरी नेते पुन्हा एकत्र येतात आणि नव्याने सुरुवात होत राहते. कार्यकर्त्यांच्या मात्र झुंजी लागतात त्या आयुष्यभरासाठी एकमेकांचे तोंड पाहणार नाही अशा पद्धतीने. त्यामुळे सर्वांनीच एका पातळीवरील विरोध आणि राजकारण थांबवून विकासाच्या मार्गावर जाणे आवश्यक आहे. केवळ कळवंड करुन काहीच होणार नाही, त्यासाठी आपापल्या मतांवर शेवटपर्यंत ठाम राहावे लागेल.
चौकट
शिवेंद्रसिंहराजे मनात नाही डोक्यात ठेवतात
राजकारण आणि समाजकारण करताना अनेक प्रकारची लोकं भेटतात. त्यांना सोबत घेऊनच राजकारण करावे लागते. शिवेंद्रराजेंच्या बाबतीत तर नेहमी संघर्षाची पार्श्वभूमी आली. कधी आप्तांशी, पक्षाशी तर कधी नेत्यांशीही संघर्ष करावा लागला. पण, बाबांनी एकदा डोक्यात ठेवले की, ते कधी विसरत नाहीत. त्यामुळे त्यांच्याशी अनेकजण दबकूनच राहतात. मित्र म्हणून ते जसे दिलदार आहेत त्याचप्रमाणे एकदा वाकड्यात शिरले तर काही खरे नाही, याचीही जाणीव अनेकांना असते.
चौकट
शशिकांत शिंदेंची मदार सातारा आणि जावळीतील माथाडींवर
विधान परिषदेचे विद्यमान आमदार असलेले शशिकांत शिंदे यांनी सातारा - जावळी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली तर त्यांची सर्व मदार ही माथाडींवर अवलंबून असणार आहे. मुंबईतील अनेक मतदार हे माथाडीच्या निमित्ताने जोडले गेले असल्याने पुढील काळात माथाडींना फार महत्त्व येणार आहे.