सातारा : पावसाचे माहेरघर असलेल्या सातारा जिल्ह्यात यंदा वरुणराजाने निराशाच केली. जुनच्या पहिल्या आठवड्याचा अपवाद वगळता जुलै, आॅगस्ट कोरडा गेला. यामुळे दुष्काळाचे ढग गडद होत असताच परतीच्या पावसाने दिलासा दिला. गेल्या तीन दिवसांत जिल्ह्यात तब्बल साडेचारशे मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या पूर्वभाग असलेला महाबळेश्वर, पाचगणी, कास, बामणोली, पाटण, कोयना, नवजा येथे पहिले तीन महिने मुसळधार पाऊस पडत असतो. आॅगस्टमध्ये कोयना धरण अनेकदा भरत असते, मात्र यंदा रविवार, दि. १३ रोजी कोयनेत ८० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे दुष्काळाची चिन्हे दिसत आहेत.फलटण, माण, खटाव, कोरेगाव तालुक्यांच्या काही भागांत परतीचा पाऊस पडतो. या पावसाला सुरुवात झाली असून, गेल्या आठ-दहा दिवसांपासून हजेरी लावली आहे. त्यामुळे या परिसरातील बळीराजा सुखावला आहे.फलटण, खटाव, वाठार स्टेशन आदी परिसरात रविवारी मुसळधार पाऊस झाला. यामुळे नाले, ओघळी भरून वाहत आहेत. येरळा नदीला शनिवारीच पाणी आले आहे. त्यामुळे बळीराजाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. रविवारी धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने पूणपणे उघडीप दिली. मात्र, दुष्काळी माण, खटाव, फलटण भागात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे बळीराजा सुखावला असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल, अशी आशा व्यक्त होत आहे.जिल्ह्यात गुरुवार, शुक्रवार, शनिवार या तीन दिवसांत सुमारे ४२५.३ मिलीमीटर पाऊस झाला आहे. यामध्ये तीन दिवसांत तालुकानिहाय पडलेला पाऊस असा : सातारा ४३.३, जावळी ४७, कोरेगाव ३५.९, कऱ्हाड ३४.८, पाटण ४७.७, फलटण ३४.०, माण १५.८, खटाव ३२.७, वाई ४३.१, महाबळेश्वर ६९.६, खंडाळा २९.४. (प्रतिनिधी)
सातारा जिल्ह्यात तीन दिवसांत साडेचारशे मिलीमीटर पाऊस
By admin | Updated: September 13, 2015 22:17 IST