सातारा : सातारा जिल्हा सहकारी बँकेच्या जिल्ह्यातील विविध शाखांमधील ३२३ जागांसाठी तब्बल ३२ हजार अर्ज आले होते. यापैकी २८ हजार जणांनी परीक्षा दिली. एकाच वेळी ऑनलाइन परीक्षा घेणे आवश्यक होते. मात्र, तेवढी संगणक यंत्रणा साताऱ्यात उपलब्ध नसल्यामुळे साताऱ्यातील एका आणि पुण्यातील पाच केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. मात्र, या परीक्षेबाबत संशय व्यक्त केला जात आहे.ही परीक्षा घेणाऱ्या वर्क वेल या कंपनीच्या पात्रतेबाबतच शंका उपस्थित झाली असून कंपनीला ज्या कऱ्हाड नगरपालिकेने अनुभवाचा दाखला दिला. त्यांच्याकडेच या कंपनीच्या कामाबाबत अभिलेख उपलब्ध नसल्याचे आढळून आले आहे. याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत २६३ कनिष्ठ लेखनिक, ६० कनिष्ठ शिपाई अशा ३२३ रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेसाठी तब्बल ३२ हजार जणांनी अर्ज केले होते. यातील पात्र उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा दि. ५ डिसेंबर ते दि. ९ डिसेंबर २०२४ या कालावधीमध्ये सातारा व पुणे या शहरात घेण्यात आली.साताऱ्यात ही परीक्षा यशोदा टेक्निकल कॅम्पस येथे घेण्यात आली, तर पुणे येथे नोवा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस बिबवेवाडी, ट्रिनिटी कॉलेज कोंढवा, एमआयटी आर्ट, डिझाइन अँड टेक्नोलॉजी युनिव्हर्सिटी लोणी काळभोर, जीएच रायसोनी कॉलेज वाघोली, पुणे या ठिकाणी घेण्यात आल्या.
वर्क वेल कंपनीलाच का मिळाले काम ?बँकेची परीक्षा घेण्याचे काम ज्या कंपनीला दिले आहे. ती सहकार आयुक्तालयाने दिलेल्या यादीमधीलच कंपनी आहे. परीक्षेचे सर्व अधिकार कंपनीला दिले असल्यामुळे त्यांच्या कामात हस्तक्षेप करत नाही, असे व्यवस्थापनाच्या वतीने सांगण्यात आले. तर साताऱ्यातच परीक्षा घेणे आवश्यक होते. असे सांगत उत्तरपत्रिकेची रिस्पॉन्स सीटही मिळावी, अशी मागणी परीक्षार्थींकडून करण्यात आली आहे.‘वर्क वेल’कंपनीबाबतचा शंका सहकार आयुक्तालयाने जिल्हा सहकारी बँकेच्या नोकर भरतीसाठी पॅनेलवर घेतलेली ‘वर्क वेल इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड’ ही कंपनी सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सहकार आयुक्तालयाच्या पॅनेलवर येण्यासाठी या कंपनीने जोडलेली कागदपत्रेच बोगस असल्याचे माहिती अधिकारात उघड झाली आहे. विशेष म्हणजे, या पॅनेलवर येण्यासाठी कंपनीने कऱ्हाड नगरपालिकेत कामगार भरतीचे काम केले असल्याचा अनुभवाचा दाखलाही जोडला आहे. पण याबाबत कऱ्हाड पालिकेत चौकशी केली असता त्याचा अभिलेख सापडत नसल्याची माहिती पालिका प्रशासन देत आहे.
माझ्याकडे सध्या तात्पुरता पदभार आहे. ‘वर्क वेल’ कंपनी संदर्भातील कागदपत्रे आम्ही शोधली; पण त्याचा अभिलेख आम्हाला सापडत नाही. - सुविधा पाटील, उपमुख्याधिकारी, कऱ्हाड नगरपालिका, कऱ्हाड