खंडाळा : गावच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत सरपंच हेच धोरण राबवित असतात. गावात कोरोनाने थैमान घातल्यानंतर ही लाट आटोक्यात आणण्याबरोबरच आगामी काळात पुन्हा गावावर अशी वेळ येऊ नये, यासाठी सरपंचांनी गावभर पायपीट करून गावातील ज्येष्ठ नागरिकांचे प्रबोधन करीत लसीकरणासाठी प्रेरित केले. त्यामुळे वृद्धांचे शतप्रतिशत लसीकरण होण्यास मदत होत आहे. सरपंचांच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.
खंडाळा तालुक्यातील खेड बुद्रुक गावात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांचे प्रमाण जास्त आढळले. गावातून कोरोना हद्दपार करण्यासाठी सरपंच गणेश धायगुडे यांनी गावात विलगीकरण कक्ष स्थापन करून बाधितांना कुटुंबापासून वेगळे केले. त्यामुळे कोरोनाला अटकाव घालणे शक्य झाले. आता तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली असल्याने पुन्हा गावात प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी गावात नियोजन केले आहे. गावातील ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना लसीकरण केल्यास कोरोनापासून दूर राहणे शक्य होणार आहे. त्यामुळे गावात प्रत्येक घरी सरपंचांनी घरभेटी देऊन ग्रामस्थांमध्ये लसीकरणाबाबत प्रबोधन केले. त्यामुळे लोकांची लसीकरणाची भीती निघून गेली. साहजिकच लसीकरणाची टक्केवारी वाढली आहे.
या भेटीप्रसंगी सरपंच गणेश धायगुडे, सामाजिक कार्यकर्ते किशोर वायदंडे, सचिन वायदंडे, अनिल रासकर, सुनील रासकर व सहकारी यांनी लोकांचे प्रबोधन केले.
(कोट)
गावातील ४५ वर्षांच्यावरील सर्व व्यक्तींचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी घरोघरी जाऊन वयस्कर ग्रामस्थांच्या मनातील भीती दूर करून त्यांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित केले. तसेच लसीकरणाच्या ठिकाणी प्रत्येकाला नेऊन त्यांना लस देण्यात आली. तरुणांचे लसीकरण सुरू झाल्यानंतर सर्वांना लस देण्याचा मानस आहे.
-गणेश धायगुडे, सरपंच
..................................................
२५खंडाळा
खंडाळा तालुक्यातील खेड बुद्रुक गावात प्रत्येक घरी सरपंचांनी घरभेटी देऊन ग्रामस्थांमध्ये लसीकरणाबाबत प्रबोधन केले.