सातारा : लांडोरीची अंडी वाचविण्यासाठी नागरिकाने सापाशी पंगा घेतल्याची घटना सोनगावजवळ मंगळवारी घडली. या नागरिकाने सापाला पोत्यात पकडून दूर सोडून दिले आणि लांडोरीची चारपैकी दोन अंडी वाचविली.बजरंग गावडे असे या धाडसी नागरिकाचे नाव असून, समर्थ मंदिर परिसरात ते राहतात. आसनगावजवळ बेंडवाडी येथे त्यांची शेतीअसून, ती त्यांनी कसायला दिली आहे. त्यांच्याकडे साताऱ्यात अनेक गुरे असून, गुरे चारण्यासाठी अजिंक्यतारा किल्ल्याच्या मागील बाजूस ते नेहमी जातात. मंगळवारी ते गुरे चारण्यासाठी गेले असता एका झाडावर पाखरांचा मोठा किलबिलाटाने गावडे यांचे लक्ष वेधले. तो नेहमीसारखा किलबिलाट नव्हता, तर संकटाची चाहूल देणारा तो गलका होता. गावडे यांनी झाडावर पाहिले असता एका मोठ्या घरट्यात लांडोरीची अंडी त्यांना पाहायला मिळाली. झाडावर घरट्याजवळच एक भलामोठा साप होता. हा साप अंड्यांवर ताव मारण्याच्या प्रयत्नात होता. चारपैकी दोन अंड्यांचे कवच त्याने फोडले होते, तर दोन अंडी शाबूत होती. गावडे यांनी सापावर लक्ष ठेवून आधी घरटे अंड्यासह अलगद खाली काढले आणि सुरक्षित ठिकाणी ठेवले. नंतर साप जमिनीवर येण्याची वाट पाहत ते तेथेच थांबले. साप जमिनीवर येताच त्यांनी अथक प्रयत्नांनी सापाला पकडले आणि जवळच्याच एका पोत्यात कैद केले. पोत्याचे तोंड बांधून त्यांनी घरटे झाडावर पुन्हा जागेवर ठेवले आणि नंतर पकडलेला साप दूरवर सोडून दिला. (प्रतिनिधी)शास्त्रोक्त प्रशिक्षण नसताना...लांडोरीच्या अंड्यांभोवती घोटाळणारा साप धामण जातीचा असल्याचे गावडे यांना आढळून आले. त्यांनी साप पकडण्याचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेतलेले नाही. तथापि, सर्पमित्रांसमवेत राहिल्याने बघून-बघून त्यांना साप पकडण्याचे जुजबी ज्ञान आहे. तेच या वेळी उपयोगाला आले. गावडे यांना विषारी आणि बिनविषारी सापांची ‘पेहचान’ आहे. मात्र, विषारी साप दिसल्यावर ते सहसा धोका पत्करत नाहीत.
‘त्या’ जिवासाठी सापाशी पंगा
By admin | Updated: August 27, 2015 23:04 IST