अरूण पवार -पाटण -निराधार व विधवा महिला, वयोवृद्ध व्यक्ती अपंगाना अधार देणाऱ्या शासनाची संजय गांधी निराधार योजनेला काही वर्षांपासून साडेसाती लागली असून, कधी अनुदान आले नाही. तर कधी कमिटीची बैठक नाही, अशी अवस्था बघावयास मिळत आहे. पाटण तालुक्यात तर शेकडो लाभार्थी अनुदानाची वाट पाहून थकले असून, नवीन आमदारांच्या अध्यक्षतेखाली नेमावयाच्या कमिटीची अद्याप स्थापनाच झालेली नाही. त्यामुळे तालुक्यातील निराधारांवर अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे.तालुक्याच्या डोंगरदऱ्यात आजही निराधारांची संख्या प्रचंड आहे. अशांना मदतीचा हात म्हणून संजय गांधी निराधार योजनेकडे पाहीले जाते. या योजनेतून दरमहा मिळणाऱ्या रकमेवर उपजीविका अवलंबून आहे. जर का एखाद्या महिन्याला एखाद्या लाभार्थीला या योजनेखाली पैसे मिळाले नाही, तर उपासमारीची वेळ येते असे अनेकांवर प्रसंग आलेले आहेत.विधानसभा निवडणुकीच्या अगोदरपासून संजय गांधी योजनेची बैठकच झाली नसल्यामुळे पाटण तालुक्यातील अनेक लाभार्थी तहसील कार्यालयात हेलपाटे घालून थकले आहे. त्यानंतर तालुक्याच्या आमदारकीत बदल झाला. शंभूराज देसाई आमदार झाले. त्यांच्या अध्यक्षतेखाली नव्या कमिटीची स्थापना होऊन संजय गांधी निराधार योजनेसाठी नवीन प्रकरणे मंजूर करावयाची असताना आजतागायत कमिटी स्थापन झालेली नाही. तसेच कमिटी स्थापन करूनही करायचे काय? दुसरीकडे या योजनेला मिळणारे अनुदान फेब्रुवारी महिन्यापासून मिळालेले नाही. त्यामुळे तालुक्यातील लाभार्थींची इकडे आड तिकडे विहीर, अशी अवस्था झाली आहे. हलाभार्थ्यांसाठी अनुदान मिळवावे तसेच योजनेची कार्यप्रणाली पूर्ववत करावी, अशी मागणी लाभार्थ्यांमधून होत आहे.योजनेच्या अर्जांची छाननी सुरूसंजय गांधी निराधार योजनेला फेब्रुवारीपासून अनुदान आलेले नाही. पाटण तालुक्यासाठी नवीन कमिटीची स्थापना अद्याप झाली नसली तरी अनुदान येताच लाभार्थीची प्रकरणे मंजूर करणे व त्यांना अनुदान वाटप करण्याचा अधिकार प्रांताधिकाऱ्यांना आहे. आमच्याकडे या योजनेखाली आलेल्या अर्जांची छाननी करण्याचे काम तलाठ्यांमार्फत सुरू आहे. अनुदान येताच तत्काळ कार्यवाही करणार आहे.-आर. एस. जाधव, नायब तहसीलदार, पाटण
‘संजय गांधी योजना’च बनली निराधार
By admin | Updated: May 7, 2015 00:17 IST