लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा येथील सुजित आंबेकर यांनी जागा वापर बदलाबाबतच्या अनुषंगाने डॉ. संदीप काटे, सुचिता काटे यांच्याविरोधात सातारा पालिकेकडे तक्रार केली होती. त्यानंतर पालिकेने पाहणी केली असता आंबेकर यांनी केलेल्या आरोपामध्ये तथ्य आढळले आहेत. त्यानुसार त्यांना ७३ हजार रुपये दंड झाला आहे. दंडाची रक्कम भरावी लागणार असल्याची नोटीस मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी डॉ. काटे यांना बजावली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, सातारा येथील डॉ. संदीप सूर्यकांत काटे व सुचित्रा संदीप काटे यांना सातारा येथील त्यांच्या जागेवर रहिवास बांधकामासाठी सातारा नगरपालिकेकडून परवाना देण्यात आला होता. मात्र, त्यांनी त्याचा वापर वाणिज्य कारणासाठी केल्याचे सुजित आंबेकर यांनी ही बाब सातारा नगरपालिकेच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर त्या प्रत्यक्ष जागेची पाहणी केली असता त्यामध्ये तथ्य आढळल्यानंतर शास्ती (दंड) ७३ हजार रुपये व घरपट्टीच्या दुप्पट रक्कम असा जवळपास दीड लाख रुपये भरण्याबाबतची नोटीस नुकतीच बजावण्यात आली आहे.
काटे यांना सातारा पेठ करंजेतर्फ सर्व्हे नंबर २८३ फा फ्लॉट नं. २९/४ व ५ ई या मिळकतीमध्ये बांधकाम करण्याकरिता नगरपरिषदेने दि. ९ जून २००८ अन्वये तद्नंतर या मिळकतीला नगरपरिषदेने दि. ८ जुलै २००९ अन्वये स्टील, तळमजला अधिक दोन मजले रहिवास कारणासाठी बांधकाम करण्याची पालिकेने परवानगी दिली होती. त्यानंतर या मिळकतीला नगर परिषदेने रहिवास करण्यासाठी सुधारित बांधकाम परवानगी दिली होती. तसेच भोगवटाप्रमाणपत्रही दिले होते. या जागेची दि.२२ जानेवारीला पाहणी केली असता या जागेत सुप्रभा हॉस्पिटल सुरू केले होते. तळमजला व पहिल्या मजल्यावर वाणिज्य वापर करीत असल्यामुळे वापरामध्ये बदल केलेला आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमानुसार ही दंडाची कारवाई करण्यात आली असल्याचे मुख्याधिकारी बापट यांनी सांगितले.
कोट..
हॉस्पिटलच्या इमारतीचा वाणिज्य वापर करीत असल्याने आम्ही नगरपालिकेचा वाणिज्य कर गेल्या १० वर्षांपासून भरत आहोत, त्याच्या पावत्यादेखील आमच्याजवळ आहे. सुरुवातीला घरबांधणीसाठी परवाना घेतला होता. नगरपालिकेने शास्तीची रक्कम भरण्यासंदर्भात नोटीस पाठविलेली आहे. या संदर्भात पालिकेला उत्तर देणार आहोत.
- डॉ. संदीप काटे