भुर्इंज : एका एकरात तब्बल १३४८ झाडांची लागवड आणि चारच वर्षांत हजारो फळांनी लगडलेली झाडं हा चमत्कार नाही, तर हे चित्र प्रत्यक्षात साकारलं आहे येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्यावर. विशेष म्हणजे, सघन पद्धतीने केलेल्या या लागवडीतील सर्वच्या सर्व आंब्यांच्या झाडांची उगवण क्षमता शंभर टक्के आहे. हे किमया पाहण्यासाठी शेतकरी आता येथे येत असून, सघन लागवड पद्धतीचा धडा येथून घेऊन जात आहेत. आजोबाने लावलेल्या झाडाचे आंबे नातवाने खायचे, असे पूर्वी समजले जायचे; पण आता तसे राहिले नाही. पारंपरिक पद्धतीत आंब्याची झाडे लावताना दहा बाय दहा मीटर अंतरावर खड्डा घेऊन केलेल्या लागवडीत एका एकरात आंब्याची फक्त ४० झाडांची लागवड होते. मात्र ‘किसन वीर’ ने अवलंब केलेल्या सघन लागवड पद्धतीत तीन बाय एक मीटर अंतराचे खड्डे घेऊन एका एकरात १३४८ आणि तीन बाय दोन मीटर अंतराचे खड्डे घेऊन एका एकरात ६७४ झाडांची लागवड केली आहे. येथे जेव्हा ही रोपे लावली गेली तेव्हा त्यांचे वय एक वर्षाचे होते. या रोपांची वाढ होताना जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर करण्यावर या ठिकाणी भर देण्यात आला. त्यामुळे झाडांना लगडलेली फळे दर्जेदार आणि देखणी आहेत. सेंद्रिय खतांसोबत वेळेवर छाटणी आणि इतर सर्व काळजी घेतली गेल्याने सघन पद्धतीच्या या बागांमध्ये प्रत्येक झाड टवटवीत फळांनी लगडले आहेत. या बागेतील फळाचे वजन २८० ग्रॅम ते ३५० ग्रॅम एवढे भरत आहे. या बागेची जोपासना करताना किसन वीर कारखान्याने उत्पादीत केलेल्याच गांडूळ खत, कृषीलक्ष्मी समृद्ध खत, फॉस्पो कंपोस्ट आणि जैविक द्रवरूप खतांचा वापर केला असून, सर्वच्या सर्व झाडांना ठिबक सिंचनाद्वारे पाणी देण्यात आले आहे. हजारो फळांनी लगडलेल्या हा बहर आल्यानंतर पहिल्यांदा ज्यावेळी किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी या बागेला भेट दिली त्यावेळी ते हरखून गेले होते. यावेळी संचालक नवनाथ केंजळे, पै. मधुकर शिंदे, नंदकुमार निकम, शेखर भोसले पाटील, दत्तात्रय शिंदे, विशाल सावंत आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) शंका-कुशंका संपल्या...या ठिकाणी हापूस, रत्ना, केशर, आम्रपाली, तोतापुरी, सिंधू अशा सहा प्रकारच्या जातींच्या आंब्यांची लागवड केली आहे. सघन लागवडीचा हा प्रयोग या परिसरातील पहिला प्रयोग आहे. त्यामुळे हा प्रयोग यशस्वी होईल की नाही, अशी शंका अनेकांच्या मनात होती. मात्र, या पद्धतीचा पूर्ण अभ्यास करून आणि कोकण कृ षी विद्यापीठाने सुचवलेल्या रोपांची लागवड करून हा प्रयोग येथे साकारला गेला.किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर सघण पध्दतीने लागवड केलेली आंब्यांची झाडे फळांनी लगडली आहेत.
‘सघन’ लागवड झाली ‘सगुण’!
By admin | Updated: May 27, 2016 22:20 IST