लोकमत न्यूज नेटवर्क
औंध : खटाव तालुक्यातील सरपंच, उपसरपंच निवडीची तारीख ८ ते १० फेब्रुवारीच्या कालावधीत पार पडणार होती. मात्र शनिवारी जिल्हाधिकारी यांनी १६ फेब्रुवारीपर्यंत स्थगिती दिल्याने वातावरण गरमागरम झाले आहे. कारण सत्तास्थापनेसाठी अनेक दिवसांपासून मनधरणी करून-करून जुळणी करणाऱ्यांची दमछाक होणार आहे, तर ज्यांना सत्तेची समीकरणे जुळविता आली नाहीत, त्यांच्यासाठी ही संधी असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ‘कही खुशी कही गम’ असे वातावरण निर्माण झाले आहे.
खटाव तालुक्यात अनेक गावांत सत्तेसाठी काठावरची कसरत सुरू आहे. निवडणूक निकालानंतर आरक्षण जाहीर झाले व त्यानंतर बेरजा सुरू झाल्या. ज्या ठिकाणी अनुसूचित जाती, ओबीसी आरक्षण पडले आहे, त्याठिकाणी उपसरपंच पदासाठी शर्यत सुरू आहे, तर ज्याठिकाणी सर्वसाधारण आहे, त्याठिकाणी मोठी डोकेदुखी असल्याचे पाहावयास मिळत आहे. एखाद्या गावात घासून निकाल झाला आहे, तिथे वातावरण गरम झाले आहे. काही गावात तर शनिवारपासून उमेदवार बाहेरगावी निघून गेले आहेत, त्यांना आता गावात परत बोलवायचे, का निवडीच्या तारखेपर्यंत त्यांचा खर्च सोसायचा, हा प्रश्न पॅनेलप्रमुखांना सतावत आहे.
निवडणूक प्रक्रियेची तारीख पुढे गेल्याने सत्तास्थापनेसाठी सदस्यांची मनधरणी करता करता दमछाक होत आहे. ज्याला त्याला पहिल्यांदाच पद हवे असल्याने आता या वाढलेल्या कालावधीचा नेमका कोणाला फायदा होणार, हे येणारा काळच ठरविणार आहे. मात्र, निवडीसाठी वाढलेले दिवस हे डोकेदुखी वाढविणारे आहेत, हे निश्चित.
(चौकट)
बैठकीला व चर्चांना ऊत
गावोगावी सत्तास्थापनेसाठी जोरदार बैठका सुरू आहेत. भावकी, पै-पाहुणे, वाडा याभोवतीच ग्रामीण भागात राजकारण फिरत आहे. त्यात ही निवडीची तारीख पुढे गेल्याने आता गावोगावचे आरक्षण पण बदलणार का? अशा चर्चांना ऊत आला आहे.