कोरेगाव : ‘कोरेगाव शहराला स्मार्ट आणि स्टॅण्डर्ड सिटी तयार करण्याचे आमदार महेश शिंदे यांचे स्वप्न आहे. श्रीश्री नगरमध्ये लोकसंख्या हा निकष न लावता, केवळ जनसेवा म्हणूनच लाखो रुपये खर्चून ट्रीमिक्स काँक्रिटीकरणाचा रस्ता तयार केला जात आहे,’ अशी माहिती जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्र. बर्गे व माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांनी दिली.
श्रीश्री नगरमध्ये रस्त्याअभावी नागरिकांचे होणारे हाल लक्षात आल्यानंतर आमदार महेश शिंदे यांनी या रस्त्याचे काम हाती घेतले. या परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांची मागणी काही दिवसांमध्येच पूर्ण होत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
राजाभाऊ बर्गे म्हणाले, ‘प्रत्यक्षात पाहणी करणे आणि नागरिकांच्या म्हणण्यानुसार, त्यांना विश्वासात घेऊन दर्जेदार रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्यात आले आहे. संपूर्ण काळी माती असलेल्या या परिसरात तंत्रज्ञानाद्वारे रस्ता तयार केला जात आहे. जमिनीपासून त्याची उंची जास्त ठेवली असल्याने पावसाळ्यात नागरिकांना त्रास होणार नाही. त्याचबरोबर हा रस्ता खचणार नाही. संपूर्ण शहराचा रोड मॅप आमदार महेश शिंदे यांच्यासमोर असून, मोठमोठ्या शहरांच्या धर्तीवर कोरेगावचा विकास व्हावा, यासाठी ते प्रयत्नशील आहेत.’
राहुल बर्गे म्हणाले, ‘क्षणिक विकास न करता दीर्घकालीन विकास करता यावा, यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरून भुयारी गटार योजना आणि ट्रीमिक्स काँक्रिटीकरणाद्वारे रस्ते तयार केले जात आहेत. जनता हीच क्वालिटी कंट्रोलर म्हणून काम करत असल्याने शहरात कुठेही काम करताना अडचणी निर्माण झाल्या नाहीत.’