सातारा : जिल्हा विधि सेवा प्राधिकरण, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, वाहतूक नियंत्रण शाखा व धनंजयराव गाडगीळ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या सभागृहात रस्ते सुरक्षा आणि अपघात जागरूकता कार्यक्रम साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-२ बी.एस. वावरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुरव, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रतिभा गाकयवाड यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा न्यायाधीश-२ बी.एस. वावरे यांनी अपघातानंतर होणारी न्यायालयीन कारवाई, तसेच द्यावी लागणारी नुकसान भरपाई व कायद्याचे उल्लंघन केल्याने होणारी शिक्षा व त्याचे परिणाम याविषयी मार्गदर्शन केले.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी सुरक्षेविषयी घ्यावयाची काळजी, रस्ते नियमांचे पालन व त्याचे परिणाम याविषयी माहिती दिली. तर सहा. पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुरव यांनी चित्रफीत आणि पीपीटी दाखवून वाहन चालविण्याबाबतच्या नियमांची माहिती दिली.