सचिन काकडेसातारा : दादर येथील कबूतरखान्यावरून झालेल्या वादामुळे लोकांची भूतदया जागी झाली असली, तरी कबुतर व पारव्यांमुळे होणारे आजार आणि त्यांचे धोके याकडे सर्रास दुर्लक्ष केले जात आहे. सातारा शहर व परिसरात पारव्यांची संख्या मोठी असून, अनेक इमारतींना त्यांनी आपले आश्रयस्थान बनवले आहे. पारव्यांची ‘गुटर-गू’ दररोज कानावर पडत असली तरी त्यांच्यामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्य समस्यांकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरेल, अशी भीती पक्षी अभ्यासकांनी व्यक्त केलीय.
खाद्यासाठी कचरा डेपोत शिरकावपारव्यांचे हे थवे आता केवळ इमारतींवरच नव्हे तर सोनगाव येथील कचरा डेपोतही दिसू लागले आहेत. खाद्याच्या शोधार्थ पारव्यांनी डेपो गाठल्याने हा एक गंभीर बदल मानला जात आहे. डेपोमधील दूषित पदार्थांच्या संपर्कात येऊन हे पारवे शहरात फिरत असल्यामुळे, त्यांच्या विष्ठेद्वारे रोगराई पसरण्याचा धोका वाढला आहे.
पारव्यांमुळे होणारे आजारतज्ज्ञांच्या मते पारव्यांच्या विष्ठेमध्ये अनेक प्रकारचे जिवाणू, विषाणू आणि बुरशी असू शकते. या विष्ठेद्वारे श्वसनाचे गंभीर आजार होऊ शकतात. तसेच फुफ्फुस व मेंदूचे आजारही बळावू शकतात. अतिसार, ताप पोटदुखीसारखे आजार होण्याचा धोकाही वाढतो.
ही तर धोक्याची घंटा..पारव्यांच्या पिसांपासून आणि विष्ठेपासून ॲलर्जीचा त्रास होऊ शकतो. दम्याचा त्रास असणाऱ्या व्यक्तींसाठी हा धोका आणखी वाढतो. साताऱ्यात काही वर्षांपूर्वी वर्चस्ववादावरून कबुतरांची एक ‘ढाबळ’ जाळून टाकण्यात आली होती. पण आज ही समस्या सामाजिक वादापेक्षा आरोग्य समस्येकडे अधिक झुकलेली आहे.
उपायोजनांची आवश्यकता..नागरिकांनी कबुतर व पारव्यांप्रति भूतदया दाखवतानाच आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. विशेषतः लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, अशा लोकांसाठी हा धोका अधिक गंभीर आहे. आरोग्य विभागाने यावर गांभीर्याने लक्ष देऊन पारव्यांमुळे होणाऱ्या आजारांबद्दल नागरिकांना जागृत करणे आवश्यक आहे.
मुंबईप्रमाणे साताऱ्यात पारव्यांना खायला घातले जात नाही. मात्र, उघड्यावर पडलेले अन्न त्यांना सहज व मुबलक उपलब्ध होते. शहरातील उंच इमारतींवर हे पारवे अधिवास करतात. भविष्यात या पारव्यांमुळे अनेक संसर्गजन्य आजार पसरू शकतात. श्वसनविकार, फुप्फुसाचे आजार होऊ शकतात. ब्लर्ड फ्लू पसरण्याचा धोकाही वाढू शकतो. त्यामुळे आरोग्याची योग्य ती काळजी घेणे क्रमप्राप्त आहे. - सुनील भोईटे, मानद वन्यजीव रक्षक